महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मुंबईतील दोन जागांवरून पक्षात अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. मुंबई उत्तर (Mumbai North lok sabha) आणि मुंबई उत्तर मध्य (Mumbai North Central Lok Sabha) या दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. मात्र या दोन जागांवर देण्यासाठी काँग्रेसकडे अजूनही सक्षम उमेदवार नसल्याने या जागांची घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. कोण द्यायचा हा प्रश्न काँग्रेससमोर आहे. त्यातच मुंबई उत्तरमधून आमदार अस्लम शेख किंवा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत. (Mumbai Lok Sabha Congress)
(हेही वाचा – C Voter Survey: मोदी सोडून पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती? सी वोटरचा सर्व्हे आला समोर)
काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ मिळाल्याने खदखद
जागावाटप करताना प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई काँग्रेसमधील नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याने नाराजी होती. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषद घेऊन ती व्यक्तही केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेस मुंबईत पाच जागा लढवत आली आहे. या वेळी त्यांना तीन जागा हव्या होत्या, मात्र दोनच जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या. त्यातही काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ पदरात पडल्याने मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. या मुद्द्यांवरूनच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख आणि अमिन पटेल यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली.
मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन त्याऐवजी मुंबई उत्तर मतदारसंघ उबाठा गटाला द्यावा, अशी मागणी त्यांनी खरगे यांच्याकडे केली आहे. आता या गोष्टीला उशीर झाल्याचे सांगत आलेल्या मतदारसंघात जोमाने निवडणूक लढवा, असा सल्ला खरगेंनी दिल्याचे समजते. असे असले, तरी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांत अजूनही उमेदवाराची घोषणा न झाल्याने अजूनही शोध चालूच आहे, हे उघड दिसून येते. (Mumbai Lok Sabha Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community