‘मला माझ्या गुरुने स्वप्नात येऊन सांगितले की, आता तुमचे पृथ्वीवरचे सर्वसामान्यांसाठीचे काम संपलेले आहे. तुम्ही परत या आपण पूजा करुया’ या आशयाची सुसाईड नोट लिहून, एका पंथाच्या ७१ वर्षीय संतांनी धार्मिक स्थळातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील घाटकोपर येथे उघडकीस आली आहे. या आत्महत्येची दुसरी बाजू मात्र थोडी वेगळी आहे. या संताला एका गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवले होते, यातून ही आत्महत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
घाटकोपर येथील घटना
हे एका विशिष्ट पंथीयांचे धार्मिक संत आहेत. घाटकोपर पूर्व लव्ह गार्डन येथील एका धार्मिक स्थळामध्ये ते राहत होते. बुधवारी रात्री त्यांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी दाखल झालेल्या पंतनगर पोलिसांना मृत संताने लिहिलेली सुसाईड नोट सापडली. त्यात त्यांनी ‘मला माझ्या गुरुने स्वप्नात येऊन सांगितले की तुमचे आता पृथ्वीवरचे सर्व सामान्यांसाठीचे काम संपलेले आहे. तुम्ही परत या आपण पूजा करुया, असे लिहिलेले होते.
(हेही वाचाः आयसीयू कक्षात कोरोनाबाधित रुग्णाने केली आत्महत्या..काय आहे कारण?)
होता विनयभंगाचा आरोप
पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेऊन अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या संतावर २०१२ मध्ये मुलुंड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात संताला अटक करण्यात आली होती व ते जामिनावर बाहेर होते. स्थानिक न्यायालयाने त्यांना या गुन्ह्यात दोषी ठरवल्यानंतर संताने सत्र न्यायालयात अपील केले होते. नुकताच सत्र न्यायालयाच्या निकाल आला होता व त्यात त्यांना दिलासा मिळाला नव्हता. यातून त्यांनी आत्महत्या केली असावी आणि बदनामीच्या भीतीने सुसाईड नोट लिहिली असावी, अशी शक्यता पंतनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास कांबळे यांनी वर्तवली आहे.
Join Our WhatsApp Community