रेमडेसिवीर औषधांच्या काळाबाजारात महिला राज

मुंबईसह राज्यभरात रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या पोलिसांनी पकडल्यानंतर प्रत्येक गुन्ह्यात महिलांचा सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

137

कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या रेमडेसिवीर औषधाचा राज्यात तुटवडा जाणवू लागताच, या औषधाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. या काळाबाजारात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आढळून आला आहे. मुंबईसह राज्यभरात रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या पोलिसांनी पकडल्यानंतर प्रत्येक गुन्ह्यात महिलांचा सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

साकीनाका येथे कारवाई

गेल्या महिन्यात मुंबई गुन्हे शाखा कक्ष-१२ने गोरेगाव येथे केलेल्या कारवाईत साकीनाका येथे एका हॉटेल व्यवसायिकासह चार जणांना अटक केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर औषधाचा साठा जप्त करण्यात आला. त्यापैकी काही रेमडेसिवीर हॉटेलच्या किचनमधून जप्त करण्यात आले होते. या टोळीची प्रमुख एक महिला होती, तिने ही औषधे उपलब्ध करुन काळ्या बाजारात विक्रीसाठी दिली होती, अशी माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

या गुन्ह्यांमध्येही महिलांचा सहभाग

चेंबूर येथील टिळक नगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत वसई येथून एकाला अटक केली होती. त्याने रेमडेसिवीर या औषधाच्या जागी अँटिबायोटिक पावडर भरुन त्याची विक्री सुरू केली होती. या विक्रीसाठी त्याने एका महिलेची मदत घेतली असल्याचे समोर आले. गुन्हे शाखा कक्ष-५च्या अधिकाऱ्यांनी दादर शिवाजी पार्क येथून रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन तिघांना अटक केली. या तिघांना एक महिला रेमडेसिवीर औषधे काळया बाजारात विक्रीसाठी विना प्रिस्क्रिप्शन उपलब्ध करुन देत असल्याचे समोर आले आहे. ही महिला एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. शिवाजी पार्क पोलिस तिचा शोध घेत आहेत.

पोलिस करत आहेत तपास

ठाण्यातील अंबरनाथ पोलिसांनी देखील नुकतीच एक कारवाई करुन, एका महिलेसह चार जणांना रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणी अटक केली आहे. नाशिक, पुणे, पालघर, मीरा-भायदंर पोलिसांनी देखील रेमडेसिवीरची काळाबाजारी रोखून टोळ्यांना अटक केली आहे. प्रत्येक ठिकाणच्या गुन्ह्यांत माहिलांचा सहभाग आढळून आलेला आहे. रेमडेसिवीरच्या काळाबाजारात महिलांचा सहभाग कसा काय वाढला, याचा तपास संबंधित पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखा करत आहे.

बचावासाठी महिलांचा वापर

गुन्हा करण्यासाठी अनेक वेळा महिला असल्याचा फायदा घेऊन त्यांना पैशांचे आमिष दाखवून, त्यांचा यामध्ये वापर केला जात असल्याची माहिती एका अधिका-यांनी दिली आहे. महिलांची पोलिस लवकर चौकशी करत नाहीत, यावरुन त्यांचा वापर केला जात असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.