यंदा १७ एप्रिल या दिवशी श्रीराम नवमी आहे. आता अयोध्येतील रामजन्मभूमीवर रामललाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या नूतन राम मंदिरात ५०० वर्षांनंतर श्रीराम जन्माचा आनंदसोहळा श्रीराम जन्मभूमीवर संपन्न होणार आहे. या दिव्य उत्सवाविषयी मराठी कलाविश्वातील कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Ayodhya Ram Temple)
उल्हास आणि जल्लोष शिगेला !!
अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिली रामनवमी बऱ्याच अर्थाने ऐतिहासिक आहे.रामलल्लाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठीचा उल्हास आणि जल्लोष शिगेला पोहोचला आहे. अयोध्येतील राममंदिर हे सुमारे 495 वर्षाहून अधिक दीर्घ प्रतिक्षेचे,संघर्षाचे फलित आहे.1528 ते 2023 पर्यंतच्या या काळात अनेक घडामोडी घडल्यात. ज्वलंत वादापासून,ते जाज्वल्य रामभक्तीचे प्रतीक ठरलेल्या अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम आणि उद्घाटन, यादरम्यान अयोध्यावासीयांना एका वेगळ्याच मानसिकतेचा सामना करावा लागला. तब्बल पन्नास दशकांनंतर रामलल्लांचा जन्मोत्सव साजरा होणार या निव्वळ कल्पनेनेच सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. रविराज देखील जणू आतुरतेने या दिवसाची वाट बघत आहेत. राम नवमीच्या दिवशी दुपारी ठीक बारा वाजता सूर्याच्या किरणांनी रामलल्लाच्या मस्तकाला होणारा तिलक हे या आनंदोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. बरेचसे वैज्ञानिक याच्यावर काम करत आहेत. हिंदू धर्मग्रंथानुसार त्रेता युगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मर्त्य जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला.महाराजा दशरथांच्या घरात आणि महाराणी कौशल्येच्या पोटी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्कराशीत चैत्र शुक्ल नवमीला रामरायाचा जन्म झाला. वनवासानंतर अयोध्येला परतलेल्या श्रीरामांच्या स्वागताप्रित्यर्थ आयोध्यावासीयांनी दिवाळी साजरी केली. ५०० वर्षांनंतरची,स्वगृही साजरी होऊ घातलेली पहिली रामनवमी, ही भारताच्या भवितव्याला सुवर्ण झळाळी देणारी ठरो. प्रभु श्रीरामांच्या आशीर्वादाने रामराज्यातील प्रत्येक दिवस हा प्रत्येक भारतवासियासाठी सुदिन ठरो…! हीच प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी हृदयपूर्ण प्रार्थना !जय श्रीराम!!!
– प्रिया सावंत, व्यक्तीमत्त्व विकास तज्ज्ञ
‘राम’ प्रत्येक भारतीयाच्या मनमंदिरात जन्माला यावा!
राम म्हणजे सर्व भारतीयांचं श्रद्धा स्थान.पराक्रमी असूनही विनम्र,सज्जनांचा कैवारी आणि दुर्जनांचा कर्दनकाळ श्रीराम, अनुकरणीय आदर्श. मी नेहमीच म्हणते, ज्यामुळे आपल्या जगण्यात राम येतो ते उत्तम काम म्हणजे राम. आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना समर्थपणे सामोरं जाण्यासाठी माणसात आत्मविश्वास असावा लागतो. कितीही कठीण प्रसंगात हा आत्मविश्वास दृढ रहावा यासाठी आपल्या श्रध्दास्थानाचं स्मरण माणूस करतो. परकियांच्या आक्रमणात माणसांच्या आत्मविश्वासाला तडा जावा म्हणून पहिला हातोडा त्यांच्या श्रद्धास्थानावर चालवला गेला.म्हणूनच प्रदीर्घ न्यायालयीन लढाई नंतर, पुराव्यांच्या आधारावर जेव्हा रामजन्मभूमीवरचं श्रद्धास्थान पुन्हा एकदा उभं राहिलं तेव्हा ते राष्ट्राच्या स्वाभिमानाला पुष्टी देणारंच ठरलं. सर्वांच्या हिताचं राज्य ही संकल्पना आपल्या संविधानातही आहेच. आणि आदर्श राज्य म्हणजे रामराज्य हे ही सर्वमान्य आहे. त्याचंच स्मरण सतत सर्वांना राहावं,यासाठीच या रामनवमीला रामजन्मभूमी मध्ये श्रीराम मंदिरात सोहोळा होईल आणि देश हिताला,ऐक्याला तो पूरक ठरेल अशीच आशा आहे. अन्यायाचा नाश करणारा, सत्यवादी राम प्रत्येक भारतीयाच्या मनमंदिरात जन्माला यावा हीच सदिच्छा.
-अनुराधा राजाध्यक्ष, अभिनेत्री
‘राम मंदिर’ प्रत्येक भारतवासीयांची आस्था
हिंदूधर्म एकूण युगे चार कृत त्रेता, द्वापार आणि सध्या चालू असलेलं कलियुग. त्रेतायुगात रामाचा जन्म झाला. श्रीराम एक सत्यपुश युगपुरुष परमेश्वराचा अवतार आणि मर्यादा पुरुषोत्तम अशी रामाची अनेक स्वरूपे आहे की परमेश्वर स्वरूप आहेत. पुढच्या प्रत्येक युगात रामाला देव म्हणून पूजला. द्वापार युगात पितामह भीष्म हे रामभक्त होते. रोज रामाची पूजा करायची. युगे बदलत गेली राम तसाच राहिला अगदी आजही म्हणून प्रत्येक गोष्टीत राम आहे. प्राचीन काळापासून रामाची अनेक मंदिरे बांधली गेली आजही अनेक प्राचीन मंदिरे आहेत रामाचा जन्म अयोध्येचा तेव्हा आयोध्येला पण प्रथम प्राचीन मंदिर होतं जय राम मंदिर होतं. भारतावर जेव्हा मोगलांच्या स्वाऱ्या झाल्या त्यात अनेक मंदिरे पाडली गेली आणि त्यावर मशिदी उभारल्या गेल्या अशीच बाबरी मशिद ही अयोध्येची पाडली गेली आणि त्या ठिकाणी पाचशे वर्षांनंतर श्रीराम भव्य मंदिर उभे राहिले. राम मंदिर हे प्रत्येक भारतवासीयाची एकच नव्हे तर माझी आस्था आहे श्रद्धा आहे म्हणून राम मंदिर बांधल्यामुळे मनाला विसावा मिळाला माझ्याच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या मनाला विसावा मिळाला श्रद्धा मिळाली आस्था मिळाली.
– अशोक समेळ, ज्येष्ठ अभिनेते-लेखक-नाटककार
अवर्णनीय क्षण
यावर्षी २०२४ साली अयोध्येमधे ५०० वर्षांनी रामनवमी हा उत्सव राम लल्लाच्या मंदिरात साजरा होतोय. खरंच मला वाटतंय, एक हिंदू म्हणून आणि या देशाचा एक नागरिक म्हणून मनापासून आनंद होत आहे. मी सुद्धा एक रामभक्त आहे आणि माझं भाग्य आहे की, मला अनेक रामाच्या स्तुती, त्यांचे अभंग, त्यांचे श्लोक गायला मिळाले. लहानपणापासून घरामधून श्रीरामाप्रतीचे जे संस्कार होतात, आपल्या संपूर्ण हिंदू धर्मामधे श्रीराम यांना एक वेगळं महत्त्व आहे. आणि मला आठवतंय माझे वडील, माझी आई, माझे संपूर्ण कुटुंबीय मनापासून अनेक रामाचे अभंग असतील, रामरक्षा असेल या गोष्टींचे संस्कार आमच्यावर झाले आणि आता एक पालक म्हणून मीही माझ्या मुलांना हे संस्कार देतोय. त्यामुळे या काळात हे घडत असताना, आपण त्याचे साक्षीदार होतोय, याचा खरंच मनापासून अभिमान वाटतोय आणि माझ्यापरीने संगीतातून मी यावेळीही सेवा देणार आहे आणि यानिमित्ताने गेली कित्येक-कित्येक वर्षं म्हणजे जवळपास पाचशे वर्षांचा हा इतिहास सगळा चालू आहे आणि यामध्ये २०२४ साली जानेवारीमधेच नव्या मंदिरामध्ये रामलल्लांची स्थापना झाली आणि तिथून जो काही त्याला अद्भुत प्रतिसाद मिळतोय, प्रेम मिळतंय हे अवर्णनीय क्षण आहेत आपल्या भारतासाठी… त्यामुळे एक नागरिक म्हणूनही आणि एक रामभक्त म्हणून मला मनापासून आनंद होतोय. यापुढेही श्रीरामांचे जे संस्कार आहेत, ते पुढच्या पिढीला देण्याचे एक कर्तव्य, एक जबाबदारी आपल्यावर आहे, असं मी मानतो आणि तो देण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन, अशी माझी भावना आहे.
-मंगेश बोरगावकर, गायक
हेही पहा –