मुंबईत हिवताप आणि डेंगी यासारख्या आजारांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पावसाळापूर्व कार्यवाही १५ मे २०२४ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानुसार मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय ६७ यंत्रणांच्या परिसरात मिळून एकूण २९ हजार १९ पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी २२ हजार ५६८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही केली आहे. तर ६ हजार ४५१ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी उपाययोजना प्रलंबित आहेत. पावसाळापूर्व कामांमध्ये विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही ७७.७७ टक्के पूर्ण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. तर २२.२३ टक्के पाण्याच्या टाक्याच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही करण्याची गरज आहे. (BMC)
कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरी सेवा-सुविधा पुरवितानाच सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने कीटकनाशक विभागाकडून पावसाळापूर्व तयारीसाठी उपाययोजनांना सुरूवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून, विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी १६ एप्रिल २०२४ रोजी पार पडली. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय संस्था आणि प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी विभाग पातळीवर विविध यंत्रणांनी सक्रियपणे सहभागी होत महानगरपालिकेसोबत डास उत्पत्ती स्थानांची संयुक्त शोध मोहीम राबवण्याच्या सुचनाही संबंधित यंत्रणांना दिल्या. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देशही भूषण गगराणी यांनी यावेळी दिले. (BMC)
विभागीय पातळीवर व्हॉट्सअॅप ग्रुप
मुंबई शहर परिसरात काही विभाग हे डेंगी आणि हिवतापाचे हॉटस्पॉट ठरू शकतात. त्याअनुषंगानेच विभागीय पातळीवर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून विभागातील संबंधित यंत्रणांना सहभागी करून घ्यावे. विविध यंत्रणा आणि महानगरपालिकेच्या संयुक्त मोहिमेतून डास प्रतिबंधात्मक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या. शाश्वत विकास ध्येय ३.३ (SDG) च्या २०३० पर्यंतच्या उद्दिष्टानुसार मुंबईत हिवताप निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच देशपातळीवर हिवताप निर्मूलनाच्या मोहीम २०३० च्या उद्दिष्टाअंतर्गत हिवताप मुक्त परिसर करण्याचे उद्दिष्ट मुंबईसाठी ठरवण्यात आले आहे. गतवर्षी (२०२३) हिवताप आणि डेंगीच्या रूग्णांचा आकडा पाहता यंदा अधिक प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामध्ये शहरी भागातील विविध यंत्रणांचा सक्रिय सहभाग ही रूग्णसंख्या कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले. (BMC)
प्राधिकरणांच्या इमारतींवरील टाक्या डास प्रतिबंधक…
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, वायूदल, अभियांत्रिकी सेवा, बेस्ट, डाक विभाग, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, दुग्ध विभाग अशा शासकीय, निम-शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. शासकीय, निमशासकीय प्राधिकरणांच्या इमारतींवरील टाक्या डास प्रतिबंधक करण्याबाबत व अडगळीचे साहित्य निष्कासित करण्याबाबत या समितीच्या बैठकीत आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. (BMC)
प्रारंभी, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांनी सादरीकरण करुन डास निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, त्यांची सद्यस्थितीचे सादरीकरण केले. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका क्षेत्रामध्ये हिवताप (मलेरिया), डेंगी व तत्सम आजारांना प्रतिबंध म्हाणून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व कीटकनाशक विभागाने नियमित उपाययोजना हाती घेतल्या असून त्यांची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. विविध यंत्रणांच्या भागात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधित करण्याची मोहीम आणखी वेगाने राबविण्यात येत आहे, असे चौबळ यांनी नमूद केले. (BMC)
कीटकनाशक विभागाच्या उपाययोजना
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी डास प्रतिबंधाच्या अनुषंगाने पावसाळापूर्व कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक स्थितीत करणे, अडगळीतील वस्तू निष्कासित करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये पाण्याच्या टाक्या, टायर, इतर वस्तू, पेट्री प्लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट इत्यादी ठिकाणीही कार्यवाही अपेक्षित आहे. याबाबतच्या सूचनाही विभागीय पातळीवर देण्यात आल्या आहेत. (BMC)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मतदानासाठी ओळखपत्राचे ‘हे’ १२ पुरावे ग्राह्य धरणार, जाणून घ्या…)
स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अळीनाशकांची फवारणी
गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये कीटकनाशक विभागाकडून तपासणी करण्याच्या तसेच पदाधिकाऱ्यांना किंवा मालकांना त्यांच्या वास्तू परिसरात डेंगी, हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अळीनाशकांची फवारणी केली जात आहे. तसेच बांधकाम कामगारांच्या राहत्या जागेतही भिंतींवर इन्डोअर रेसिड्यूल स्प्रेइंग (आयआरएस) कीटकनाशकांची फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. (BMC)
अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या माध्यमातून सर्वेक्षण
झोपडीवासियांच्या भागात पाण्याच्या टाक्या झाकून ठेवण्याबाबत तसेच अडगळीतील जागेच्या वस्तू शोधून निष्कासित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच डेंगी आणि चिकुनगुनिया प्रसारक (एडिस) डासांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कीटकनाशक विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती आढळणाऱ्या ठिकाणी धूम्रफवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community