कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण जनतेत कोविड 19 या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याबरोबरच कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याच्या पंचायत राज संस्थांना प्रयत्नांना सहकार्य करणे तितकेच महत्वाचे आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात दिला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचणी सुविधा आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा यांची कमतरता यामुळे ग्रामीण भागात कोरोनाला रोखणे ही तुलनेत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. असे असले तरी काही गावांनी या कमतरतानांच आपली बळकट बाजू बनवू , कोरोनाच्या संकटात गावाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सहा हजार लोकसंख्या असलेल्या भोसी या गावाने कोरोनामुक्तीसाठी चोखाळलेल्या मार्ग ही असाच एक यशस्वी प्रयत्न असून आता प्रशासन जिल्ह्यातील इतर गावांमध्ये त्याचे अनुकरण करणार आहे.
तब्बल 119 गावकरी कोविडबाधित निघाले!
एका लग्न समारंभानंतर भोसी गावात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी पुढाकार घेऊन, ग्राम पंचायत आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने गावात आरोग्य शिबीर आयोजित करून त्यात गावकऱ्यांच्या रॅपिड अॅनटीजेन आणि आरटीपीसीआर कोरोना चाचण्या केल्या. त्यात तब्बल 119 गावकरी कोविडबाधित निघाले. या चाचण्यांमध्ये बाधित आढळलेल्या सर्व गावकऱ्यांचा गावातील अन्य व्यक्तींशी संपर्क टाळून, संसर्गाची ही चेन ब्रेक करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपापल्या शेतात 15 ते 17 दिवस विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले. शेतमजूर आणि स्वतःची शेती नसलेल्या अन्य बाधितांची सोय जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी आपल्या शेतात एक 40 बाय 60 आकाराची शेड उभारून त्यात केली.
(हेही वाचा : आता कोवॅक्सिनचे उत्पादन वाढणार! भारत बायोटेककडून मोठी माहिती)
शेतात राहून संसर्गाची साखळी तोडली
गावातील आशा कार्यकर्ती आणि अंगणवाडी सेविका या दररोज या रुग्णांना भेट देऊन त्यांची विचारपूस करत असत. या रुग्णांना जेवण, आवश्यक ती औषधे आणि अन्य गरजेच्या वस्तू ग्रामसेवक आणि आरोग्य विभाग यांनी उपलब्ध करून दिल्या. या गावकऱ्यांनी 15 ते 20 दिवस विलगीकरणात काढल्यानंतर त्यांची भोकर या तालुक्याच्या गावी आरोग्य तपासणी झाल्यानंतरच ते कोरोनामुक्त व्यक्ती म्हणून गावात परतले. लक्ष्मीबाई अक्केमवाड आणि विशाल कल्याणकर या दोघा रुग्णांनी आपला विलगीकरणाचा अनुभव सांगत शेतात राहून संसर्गाची साखळी तोडल्यानेच गावातले इतर नागरिक बाधित होण्यापासून वाचले असे सांगितले. विशेष म्हणजे गावातील कुठल्याही रुग्णाला कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले नाही.
भोसी पॅटर्न जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी राबविणार
कोरोनाबाधित व्यक्तींना इतरांच्या संपर्कात येऊ न देणे, कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळणे एव्हढ्या साध्या उपायांच्या मदतीने पुरेशा आरोग्य सुविधा नसलेली गावेही कोरोना मुक्त होऊ शकतात असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी व्यक्त केला. भोसी गाव पूर्णपणे कोरोनातून मुक्त झाले असून गेल्या दीड महिन्यात गावात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण सापडला नाही, असेही भोसीकर यांनी आवर्जून सांगितले. नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या 158 कोरोना स्पॉटपैकी 28 ठिकाणे ही कोरोना हॉटस्पॉट आहेत, त्यापार्श्वभूमीवर कोरोनामुक्तीचा हा भोसी पॅटर्न हा सध्या जिल्ह्यात नावाजला जात आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी गावकरी , लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित समन्वयाचे चांगले उदाहरण असलेला हा भोसी पॅटर्न जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी राबविणार असल्याचे सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community