पी-३०५ बार्ज वरील कॅप्टनसह इतरांवर गुन्हा दाखल

142

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात अडकून बुडालेल्या पी-३०५ या बार्ज दुर्घटनेप्रकरणी मुंबईतील येलो गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बार्ज दुर्घटनेत बचावलेल्या एका इंजिनियरच्या फिर्यादीवरुन बार्जवरील कॅप्टनसह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत ४९ जनांचा मृत्यू झाला असून, २९ जण अजूनही बेपत्ता आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अरबी समुद्रातील बॉम्बे हाय जवळ तेल विहिरीवर काम करणारी पी- ३०५ ही बार्ज तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात अडकली होती. या बार्जवर २६१ कर्मचारी काम करत होते, त्यात १८० कर्मचा-यांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून, ४९ कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह जे.जे.रुग्णालयात आणण्यात आले असून, २९ बेपत्ता कर्मचा-यांचा शोध घेण्यात येत आहे. या दुर्घटनेप्रकरणी येलो गेट पोलिसांनी बार्जवरील बचावलेलेल्या इंजिनिअरची फिर्याद लिहून घेतली आहे. त्याच्या फिर्यादीवरुन बार्जच्या कॅप्टनसह इतरांवर भा.दं.वि कलम ३०४(२),३३८,३४ अनव्ये (सदोष मनुष्यवधाचा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचाः ओएनजीसीच्या जहाज अपघाताची आता समिती करणार चौकशी)

काय आहे फिर्यादीत?

सूत्रांच्या म्हणण्यानुसार समुद्रात असलेल्या बॉम्बे हाय जवळील ओएनजीसी ऑइल प्लांट या ठिकाणी तेल उत्खननाचे काम सुरू होते. त्याठिकाणी ४ बार्ज काम करत होत्या. चक्रीवादळाचे संकट येत असल्याचे बघून त्यापैकी तीन बार्जला तेथून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. मात्र पी-३०५ वरील बार्जच्या कॅप्टनला कर्मचा-यांनी बार्ज काढण्यास सांगून देखील, मला तसा आदेश नसल्याचे त्याने सांगून बार्ज काढण्यास नकार दिला होता. असे फिर्यादीत म्हटले असल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.