IPL 2024 CSK vs LSG : धोनीचा अशक्य षटकार आणि राहुलची सुपर डुपर खेळी

IPL 2024 CSK vs LSG : के एल राहुलने टी-२० राष्ट्रीय संघाचे दरवाजे ठोठावणारी खेळी साकारली तर धोनीचा अजब षटकारही लक्षात राहिला. 

183
IPL 2024 CSK vs LSG : धोनीचा अशक्य षटकार आणि राहुलची सुपर डुपर खेळी
  • ऋजुता लुकतुके

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आपल्या कथित शेवटच्या आयपीएल हंगामाचा पुरेपूर आनंद लुटताना दिसतो आहे. शेवटच्या षटकांमध्ये मनासारखे षटकार खेचताना काही नवीन फटकेही त्याने क्रिकेटला बहाल केले आहेत. लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध यष्टीच्या पार एका टोकाला जाऊन थेट यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू टोलावत त्याने मारलेल्या षटकाराची चर्चा येणारे आणखी काही हंगाम होत राहील. धोनीच्या शेवटच्या षटकांतील हाणामारीमुळे त्याने ३०० धावांचा स्ट्राईकरेटही या हंगामात राखला आहे. (IPL 2024 CSK vs LSG)

लखनौ विरुद्ध संघाचे ६ गडी बाद झाले असताना १८ व्या षटकात धोनी मैदानात उतरला. धावगती फारशी समाधानकारक नव्हतीच. त्यामुळे आल्या आल्या षटकारासाठी प्रयत्न करणं एवढंच धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) हातात होतं आणि त्याने १९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो अविस्मरणीय षटकार चढवला. डावखुरा तेज गोलंदाज मोहसीन खानचा तो चेंडू आखूड टप्प्यावर पडला. त्यामुळे धोनीकडे दिशेचा अंदाज घ्यायला थोडा वेळ होता. चेंडू उंच उडालेला आणि यष्टीच्या खूपच उजवीकडे होता. धोनीने चेंडूच्या दिशेनं जात तो अचूक टिपला आणि चक्क यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून थेट सीमापार भिरकावून दिला. ९ चेंडूंत २३ धावा करताना ४२ वर्षीय धोनीचा स्ट्राईक रेट होता ३११ धावांचा. (IPL 2024 CSK vs LSG)

(हेही वाचा – Rahul Bhandarkar : राहुल भांडारकर यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरक पुरस्कार 2024 प्रदान)

राहुल टी-२० विश्वचषकात भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी उत्सुक

हा फटका खेळताना धोनी यष्ट्यांच्याही मागे गेला. इतका त्याने तो उशिरा उचलला होता. पत्नी साक्षी त्याची ही खेळी प्रेक्षकांत बसून पाहत होती. धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) या छोटेखानी खेळीमुळे चेन्नईने निर्धारित ६ बाद १७६ धावा केल्या. लखनौची एकाना स्टेडिअमची खेळपट्टी काहीशी संथ आहे. त्यामुळे हे आव्हानही नाही म्हटलं तरी लखनौसाठी कठीण होतं. पण, ते सोपं केलं के एल राहुल आणि क्विंटन डी कॉक या अनुभवी सलामीवीरांनी. दोघांनी १४ षटकांत १३४ धावांची भागिदारी करत चेन्नईचं आव्हानच संपवलं आणि यात राहुलने ५३ चेंडूंत ८२ धावा केल्या. राहुल टी-२० विश्वचषकात भारतीय संघात (Indian team) जागा मिळवण्यासाठी उत्सुक आहे आणि आयपीएल ही एकमेव संधी त्याच्याकडे आहे. (IPL 2024 CSK vs LSG)

अशावेळी यष्टीरक्षक-फलंदाज आणि कर्णधार म्हणूनही त्याने आपली छाप सोडली आहे. लखनौचा हा सलग चौथा विजय होता. तर राहुलची ८२ धावांची खेळी ही टी-२० सलामीवीर म्हणूनही परिपूर्ण होती आणि निवड समितीला संघ निवडीपूर्वी विचार करायला लावणारी नक्कीच होती. (IPL 2024 CSK vs LSG)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.