वाझेनंतर आता ‘या’ अधिका-याची पोलिस दलातून हकालपट्टी

मुकेश अंबानी प्रकरण, मनसुख हिरेन हत्या यामध्ये त्याने वाझेला साथ देऊन या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यास मदत केली होती.

153

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. सचिन वाझे पाठोपाठ काझीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आता अटकेत असलेल्या सुनील माने याच्यावर देखील बडतर्फीची कारवाई करण्यात येणार, अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार आणि कारचा मालक मनसुख हिरेन याची हत्या या प्रकरणांत एनआयएने कारवाई केली. यात मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, तसेच गुन्हे शाखा कक्ष-११चे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्यासह पाच जणांना अटक झाली. मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हत्या ही दोन्ही प्रकरणे एकत्रित करुन तपास सुरू आहे. ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी निगडित आल्यामुळे या प्रकरणांत पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचाः भिवंडीच्या ‘त्या’ साठ्यातून सचिन वाझेने घेतली स्फोटके? )

बडतर्फीची कारवाई

पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या या तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांपैकी सचिन वाझेला ११ एप्रिल रोजी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बडतर्फ केले होते. दरम्यान २१ मे रोजी शुक्रवारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाजुद्दीन काझी याची देखील पोलिस सेवेतून बडतर्फी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय संविधान १९४९ मधील व महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम कलम-३११मधील तरतुदींच्या अन्वये दोघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचाः सचिन वाझेची पोलिस दलातून हकालपट्टी! मुंबई पोलिस आयुक्तांचे आदेश)

कोण आहे काझी?

रियाजुद्दीन काझी हा १०२ बॅच मधील पोलीस उपनिरीक्षक असून, २०१० मध्ये पोलिस खात्यात दाखल झाला होता. मुंबईत वर्सोवा येथे सोनसाखळी चोरी विरोधी पथक याठिकाणी काम केल्यानंतर, त्याची बदली सीआययु येथे करण्यात आली होती. सचिन वाझे सीआययु प्रभारी झाल्यानंतर वाझेसारखे आपले नाव करण्यासाठी रियाजुद्दीन काझी प्रत्येक कामात वाझेच्या सोबत असायचा. मुकेश अंबानी प्रकरण, मनसुख हिरेन हत्या यामध्ये त्याने वाझेला साथ देऊन या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यास मदत केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.