- नित्यानंद भिसे
महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. आरोप प्रत्यारोप यांना ऊत आला आहे. यामध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आघाडी घेतली आहे. आरोप करताना संजय राऊत यांनी मात्र भाषेची पातळी घसरवली आहे. राऊतांच्या या आक्षेपार्ह भाषेतून टीका करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे पुरते नुकसान केले आहे. कारण त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचे राजकारणात ज्यांच्याशी शत्रुत्व निर्माण झाले आहे. ते शत्रुत्व कधीच संपणारे नाही. अशा शत्रूंची फौज संजय राऊतांनी उभी केली आहे. यासाठी संजय राऊतांना अवसान देणारे शरद पवार (Sharad Pawar) आहेत, हे सर्वज्ञात आहे. आज त्याच शरद पवारांकडे त्यांनी निर्माण केलेल्या पक्षाचे नाव नाही आणि चिन्हही नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि संजय राऊत यांचे होयबा बनल्यामुळे त्यांच्याकडेही ना शिवसेना पक्ष उरला आहे ना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण राहिले आहे. तसेच भाजपासारखा मित्रही नाही. या सगळ्या राजकीय घडामोडीत हे सगळे जण एकमेकांसाठी शकुनी ठरले आहेत.
संजय राऊत ठरले उद्धव ठाकरेंसाठी विश्वासघातकी
जेव्हा २०१९च्या निवडणुकीचे निकाल लागले, तेव्हा भाजपाला आपल्या मदतीशिवाय सत्तेचे गणित जमवणे कठीण आहे आणि भाजपाला बाजूला केले तर दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणे शक्य आहे, हे लक्षात येताच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांशी सल्लामसलत केली. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भाजपाच्या नेत्यांचे फोन घेऊ नये असेही सांगितले. आणि पडद्यामागून दोन्ही काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शरद पवार यासाठी संजय राऊतांकरिता मार्गदर्शक होते आणि संजय राऊत पवारांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत होते. उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत हा विश्वासघात करायला शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत यांनी भाग पाडले. सत्ता आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांवर हीन दर्जाची टीका करणे सुरु केले. मुख्यमंत्री पद मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांचा पक्षातील आमदार, खासदारांशी संपर्क तुटला. त्यामुळे २०२२ ला शिवसेनेचे ४० आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले, पुढे त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी संजय राऊत यांनी त्या आमदारांवर अत्यंत खालच्या पातळीवर जावून टीका केल्याने निघून गेलेले आमदार परत येण्याची शक्यता विरली. परिणामी आज शिवसेना पक्ष उध्दव ठाकरेंचा न राहता तो एकनाथ शिंदेचा बनला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत, त्या प्रचारातही संजय राऊत अत्यंत वाईट भाषेत टीका करत आहेत. संजय राऊत ज्या भाषेत बोलत आहेत, त्यामुळे कधीही शत्रुत्व संपणार नाही असे शत्रू उध्दव ठाकरे यांच्यासाठी राजकारणात बनवले आहेत. ज्या विश्वासाने उध्दव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जवळ केले ते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या म्हणण्यानुसार उध्दव ठाकरेंना हिंदुत्वापासून दूर नेले आणि शिवसेनेला निधर्मी विचारांच्या दोन्ही काँग्रेसच्या पंक्तीत आणून बसवले. परिणामी शिवसेना फुटली आणि पक्षही उध्दव ठाकरेंच्या हातून निघून गेला. अशा प्रकारे संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांच्यासाठी शकुनी ठरले.
उद्धव ठाकरेंचा सत्तेचा हव्यास ठरला युतीसाठी मारक
एकेकाळी हिंदुत्वाच्या विचारांवर शिवसेना आणि भाजपा यांची युती होती. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षात जुन्या नेत्यांना बाजूला सारून त्यांच्या जागी नव्यांना आणले, ज्यात संजय राऊत (Sanjay Raut) अग्रभागी होते. संजय राऊतांनी सुचवणे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यावर अंमल करणे अशी अवस्था २०१९पासून सुरु झाली आणि २५ वर्षांची भाजपा – शिवसेना ही युती उद्धव ठाकरे यांनी तोडली. त्यानंतर हिंदुत्वविरोधी दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री बनले. जे बाळासाहेबांना केव्हाही शक्य होते, पण त्यांनी कधीच तसे केले नाही. राज्याचा कारभार सांभाळताना आणि दोन्ही काँग्रेसशी जुळवताना उद्धव ठाकरे यांचे पक्षाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी ४० आमदार सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. या दरम्यान त्यांनी आमदारांना विश्वासात घेतले नाही. उलट त्यांना वाईट शब्दांत हिनवले. त्यानंतर भाजपावर खोटेनाटे आरोप करणे सुरु केले. उद्धव ठाकरे यांच्याही टीकेमुळे भाजपाशी जो दुरावा झाला तो आता कधीच कमी होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता काँग्रेसप्रणित पुरोगामी आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारापासून ते दूर गेले आहेत. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार केला आणि भाजपसोबत युती टिकवून ठेवली ती युती उध्दव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी तोडली आणि भाजपासोबत कायमचे शत्रुत्व पत्करले, त्यामुळे भाजपासाठी उद्धव ठाकरे शकुनी ठरले.
शरद पवारांच्या कुटनीतीने उद्धव ठाकरे पडले एकाकी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेना आणि भाजपाची युती तोडण्याचे षडयंत्र रचले, त्यासाठी त्यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) बळ दिले. आणि शिवसेनेला दोन्ही काँग्रेससोबत आणून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपा शिवसेनापासून दूर गेला. अवघ्या महाराष्ट्राने यामागील शिल्पकार शरद पवार असल्याचे पाहिले. जेव्हा शिवसेना फुटली आणि मविआ सरकार अल्पमतात आले, तेव्हा मात्र शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एकटे सोडून दिले. संसदीय राजकारणाचा अनुभव नसलेले उद्धव ठाकरे यांनी मग कुणाचाही विचार न करता थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळले. हीच चूक शेवटपर्यंत शिवसेनेला नडली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणे आवश्यक होते, हे शरद पवार जाणून होते. तरीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला नाही. शिवसेना फुटली, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा सर्व मुद्दे उद्धव ठाकरेंच्या बाजूने होते, मात्र उध्दव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव न करता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला, ही त्यांची गंभीर चूक होती असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. परिणामी उद्धव ठाकरे यांची सत्ता गेलीच शिवाय पक्षाचे नाव आणि चिन्हही गेले. आज शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे कायदेशीररित्या गेला आहे. संसदीय पेचप्रसंग निर्माण झाल्यावर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना एकाकी सोडल्याने त्यांचा पक्ष हातून निघून गेला, यामागे शिवसेनेसाठी शरद पवार शकुनी ठरले.
नाना पटोले यांच्या वृत्तीने मविआ बनली कमकुवत
मविआ सरकार स्थापन झाल्यावर विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेसने मागून घेतले, नाना पटोले अध्यक्ष बनले. जेमतेम वर्ष होत नाही तोच पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने पुढील दीड वर्षे अध्यक्षपदासाठी उमेदवारच दिला नाही. त्या काळात विधानसभा उपाध्यक्ष चालवू लागले. जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा 40 आमदार निघून गेले, सरकार अल्पमतात आले तेव्हा विश्वासदर्शक ठराव आणण्यासाठी विधानसभेत अध्यक्षपद रिक्त असणे भाजपासाठी फायद्याचे ठरले. त्यानंतरही फुटलेल्या शिवसेनेच्या आमदारांवर पक्षांतर्गत कायद्यानुसार कारवाई करण्यासाठीही विधानसभा अध्यक्ष असणे गरजेचे होते, पण नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे आणि नंतर काँग्रेसने हे पद रिक्त ठेवल्याने शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना कायदेशीर संरक्षण मिळाले. ज्या शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत यांनी मविआ सरकार स्थापन करण्याचा घाट घातला ते सरकार अल्पमतात आल्यावरही वाचवणे शक्य होते पण नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या राजीनामामुळे ते शक्य झाले नाही. यात नाना पटोले मविआसाठी शकुनी ठरले.
Join Our WhatsApp Community