रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना त्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांचं नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी वाहन चालक तथा मालक जबाबदार असेल असा इशारा देणाऱ्या महापालिका प्रशासनाने अखेर ज्या ठिकाणची वृक्ष छाटणी (Tree Cutting) करायची आहे त्या ठिकाणी आगाऊ सूचना वजा फलक लावून त्या ठिकाणी वाहन न लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र यापूर्वी असे बॅनर न लावणाऱ्या प्रशासनाला आता उपरती झाल्याने जनतेकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने पावसाळापूर्व खबरदारी म्हणून मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची (Tree Cutting) कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत २२ हजार ३३४ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. तर, खासगी तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात ४ हजार ९०९ गृहनिर्माण संस्था व इतर खाजगी मालमत्ता आदींना नोटीस जारी करण्यात आली आहे. झाडे छाटणी करण्याचे काम महानगरपालिका प्रशासनाकडून प्रगतिपथावर असले तरी या कामांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. नागरिकांनी अडथळा निर्माण करणारी वाहने इतरत्र हलवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
(हेही वाचा BMC : नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्यासाठी आता सर्व अधिकाऱ्यांची होणार समन्वय संवाद बैठक)
यापूर्वी थेट छाटणीचे (Tree Cutting) काम सुरू करणाऱ्या उद्यान विभागाच्यावतीने आता ज्या ठिकाणच्या रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाणार आहे. त्या झाडांच्या भोवताली बॅनर लावून या ठिकाणी झाडांच्या फांद्यांची छाटणी होणार असल्याने वाहने उभी करण्यात येऊ नये,अशा प्रकारच्या संदेश देत आहेत. ज्यामुळे आता झाडांच्या फांद्यांची छाटणी होणार आहे, याची आगाऊ कल्पना मिळू शकते. तसेच आपण ज्या रस्त्याच्या कडेला वाहन उभे करत आहोत. तेथील झाडाची छाटणी होणार असल्याने वाहनचालक तथा मालक त्या ठिकाणी आपली वाहने उभी करू शकणार नाही.
खासगी जागेतील छाटणी बाबत प्रशासनाशी संपर्क साधावा
मुंबईतील रस्त्याच्या कडेची झाडे तसेच सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची छाटणी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जाते. तथापि, गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा याठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. त्यामुळे, अशाप्रकारच्या खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी (Tree Cutting) करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community