महापौरांचा शिवसेनेच्या गडात अपमान! भाजपच्या गडावर मात्र मानसन्मान

राजकीय कुरघोडी करायला निघालेल्या महापौरांना भाजपने राजकारण न करता त्यांचा सन्मान राखला.

166

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना स्वपक्षातील नगरसेवकांच्या प्रभागात मानसन्मान मिळत नसल्याने, त्यांनी आता भाजप नगरसेवकांच्या प्रभागात आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. परंतु भाजपने महापौरांच्या या हस्तक्षेपाबाबत नाराजी व्यक्त न करता, त्या पदाला मानसन्मान देण्याचाच पावित्रा घेतला आहे. त्यामुळेच कांदिवली पूर्व येथील ग्रोव्हेल्स मॉलमध्ये उभारण्यात आलेल्या वॉक इन ड्राईव्ह लसीकरणाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते पार पडले. भाजपचे खासदार,आमदार आणि स्थानिक नगरसेवक असतानाही महापौर पदाचा मान राखत भाजपनेही तिथे राजकारण न करता त्यांच्या हस्ते उद्घाटन करुन घेतले.

कांदिवली पूर्व येथील ग्रोव्हेल्स मॉलमध्ये महापालिकेच्या आर दक्षिण विभागाच्यावतीने वॉक इन ड्राईव्ह लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या लोकार्पण प्रसंगी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, स्थानिक भाजप नगरसेविका सुनीता यादव, नगरसेविका सुरेखा पाटील, उपायुक्त विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

शिवसेनेने डावलले

या भागातील स्थानिक नगरसेविका सुनीता यादव आहेत. या लसीकरण केंद्रासाठी त्यांनी प्रथम महापालिकेकडे पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला होता. त्यानंतर खासदार गोपाळ शेट्टी यांनीही पत्रव्यवहार केला. या केंद्रासाठी भाजपने पत्रव्यवहार केल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री रामदास कदम यांनीही महापालिकेकडे याबाबत मागणी केली. यापूर्वी दादर पश्चिम येथील कोहिनूर स्क्वेअरमधील वाहनतळाच्या जागेत देशातील पहिले वॉक ईन ड्राईव्ह उभारण्यात आले. याठिकाणी शिवसेनेचा खासदार, शिवसेना आमदार आणि शिवसेनेचा स्थानिक नगरसेवक तसेच सभागृह नेतेही याच विभागातील आहेत. तरीही शिवसेनेने महापौरांना या उद्घाटनापासून दूर ठेवत त्यांना डावलले.

(हेही वाचाः ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाच्या उद्घाटनात महापौर ‘आऊट’!)

राजकारण नको, समाजकारण करू

परंतु दुसरीकडे भाजपच्या गडात भाजपच्या नेत्यांनी महापौरांचा मान राखत त्यांच्या हस्ते वॉक ईन ड्राईव्ह लसीकरणाचे उद्घाटन करुन घेतले. लसीकरण केंद्र हे जनतेसाठी असून त्याठिकाणी राजकारण नको. महापौरांनी याठिकाणी जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपने त्यांच्या राजकारणाच्या पलिकडे जाऊन या पदाचा मान राखण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेने जिथे त्यांना डावलले होते, तिथेच मानाचे पान देत मनाचा उदारपणा दाखवला. त्यामुळे राजकीय कुरघोडी करायला निघालेल्या महापौरांना भाजपने राजकारण न करता त्यांचा सन्मान राखला.

महापौरांचा मान शिवसेना नाही, पण भाजप राखू शकते

या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाची तारीख माहीत करुन घेण्यासाठी स्थानिक नगरसेविका सुनीता यादव यांचा पाठपुरावा सुरू होता. परंतु प्रशासनावर महापौरांचा दबाव होता. त्यामुळे महापौरांची तारीख मिळाल्यानंतर त्यांनी याचे उद्घाटन केले. स्थानिक भाजप नगरसेविका सुनीता यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, याची कल्पना भाजपला एक दिवस आधीच मिळाली होती. त्यामुळे भाजपला जर राजकारण करायचे असते, तर आम्ही आधीच याचे उद्घाटन करुन घेतले असते. पण मुंबईच्या महापौरांचे एक वेगळे स्थान आहे, त्यांचा मान आम्ही लोकप्रतिनिधी नाही राखणार तर कोण राखणार, असा सवाल त्यांनी केला. उलट भाजपच्या नेत्यांनी महापौरांनाच उद्घाटनाचा मान देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार हे उद्घाटन पार पडले, असे स्थानिक नगरसेविका सुनीता यादव यांनी म्हटले आहे. महापौरांचा मान शिवसेना राखू शकत नाही, पण भाजप राखू शकतो हे यावरुन दिसून आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः महापौरांकडून आपल्याच समिती अध्यक्षाला कात्रजचा घाट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.