Vehicle Parking : मुंबई पोलीस आयुक्तालयासमोरच वाहन चालकांची लूट; विनामूल्य पार्किंगतळावर पार्किंग माफियांचा कब्जा 

विनामूल्य पार्किंग (Vehicle Parking) असताना देखील वाहन चालकाकडून पार्किंगचे एका तासासाठी ३०० रुपये आकारत आहेत. या ठिकाणी दिवसभरात जवळपास शेकडो वाहने पार्क होतात, पार्किंग माफियाची या बेकायदेशीर पार्किंगमधून लाखो रुपयांची दिवसाला कमाई होत आहे.

234
Vehicle Parking : मुंबई पोलीस आयुक्तालयासमोरच वाहन चालकांची लूट; विनामूल्य पार्किंगतळावर पार्किंग माफियांचा कब्जा 
Vehicle Parking : मुंबई पोलीस आयुक्तालयासमोरच वाहन चालकांची लूट; विनामूल्य पार्किंगतळावर पार्किंग माफियांचा कब्जा 
  • संतोष वाघ

महानगरपालिकेने केलेल्या मोफत वाहनतळावर (Vehicle Parking) पार्किंग माफियांकडून कब्जा करण्यात आला आहे. पार्किंग माफियाकडून वाहनचालकांची ही लूट क्रॉफर्ड मार्केट, मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर सुरू आहे. महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. आझाद मैदान पोलिसांनी काही आठवड्यापूर्वी या पार्किंग माफियांवर गुन्हा दाखल करूनही त्यांच्यावर कुठलाही परिणाम झालेला दिसून येत नाही.

कुठे सुरु आहे पार्किंग माफियांकडून लूट? 

दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट, हज इमारत तसेच मुंबई पोलीस आयुक्तालय यांसारखी अनेक महत्वाची ठिकाणे आहेत. या ठिकाणी भेट देण्यासाठी किंवा कामानिमित्त अनेक जण आपल्या खाजगी वाहनातून येतात. वाहन पार्किंगची (Vehicle Parking) समस्या असल्यामुळे महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी क्रॉफर्ड मार्केट, मुंबई पोलीस मुख्यालयासमोर आणि सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स समोर वाहने पार्क करण्यासाठी जागा नेमून दिली आहे. या ठिकाणी पार्किंगचे दर ठरवून वाहन तळ सांभाळण्यासाठी कंत्राटदार नेमले आहेत. २ वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने एका महिला बचत गटाला पे अँड पार्कचे (Vehicle Parking) कंत्राटदार म्हणून नियुक्त केले होते. परंतु या बचत गटाकडून या कामासाठी दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला होता. मात्र हा दुसरा कंत्राटदार वाहनचालकांकडून जादा शुल्क आकारत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर हे कंत्राट रद्द करण्यात आले होते. नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत वाहन चालकांकडून शुल्क आकारले जाणार नसल्याचे मनपा अधिकारी यांनी म्हटले होते.

(हेही वाचा Congress : गोव्यात आमच्यावर संविधान जबरदस्तीने लादले; काँग्रेसचे उमेदवार विरिटो फर्नांडिस यांचे वादग्रस्त वक्तव्य)

एक तासासाठी ३०० रुपये आकारतात

५ जानेवारीपासून वाहनचालकांसाठी पार्किंगची (Vehicle Parking) जागा विनामूल्य केली जाईल, आम्ही आधीच उप मुख्यअभियंता (वाहतूक) यांना नवीन कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली असल्याचे  मनपा अधिकाऱ्याने म्हटले आहे. नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत वाहन चालकांकडून शुल्क आकारले जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्या ठिकाणी विनामूल्य पार्किंगचे पोस्टर देखील लावण्यात आले होते, परंतु पार्किंग माफियांनी हे पोस्टर फाडून या ठिकाणी विनामूल्य पार्किंग (Vehicle Parking) असताना देखील वाहन चालकाकडून पार्किंगचे एका तासासाठी ३०० रुपये आकारत आहेत. या ठिकाणी दिवसभरात जवळपास शेकडो वाहने पार्क होतात, पार्किंग माफियाची या बेकायदेशीर पार्किंगमधून दिवसाला लाखो रुपयांची कमाई होत आहे.

parking 1

ना महापालिकेचा धाक नो पोलिसांचे भय 

ज्या वाहनचालकाकडून नियमावर बोट ठेवून पार्किंगचे (Vehicle Parking) पैसे देण्यास नकार दिला जातो तेव्हा हे पार्किंग माफिया भांडण करून त्यांच्या महागड्या वाहनाचे नुकसान करतात, असा आरोप अनेक वाहन चालकाकडून करण्यात येत आहे. या टोळ्यांवर ना पालिकेचा धाक आहे ना त्यांना पोलिसांची भीती उरली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याने काही आठवड्यापूर्वी बेकायदेशीर पार्किंग रॅकेट चालवल्याप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणाला अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवान अली उर्फ आलम सफिउल्ला अन्सारी (२९) असे आरोपीचे नाव आहे, तो एका पार्किंग कंत्राटदाराचा माजी कर्मचारी होता, ज्याच्या कराराचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने नूतनीकरण केले नव्हते. नागरी संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या मोफत पार्किंग स्लॉटमध्ये वाहने पार्क करण्यासाठी वाहनचालकांकडून तो शुल्क घेत असे.

(हेही वाचा Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात शकुनी कोण?)

पार्किंग माफियाला अटक 

वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांकडून काही लोक पैसे वसूल करत असल्याची माहिती दोन ठिकाणी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, निरीक्षक अब्दुल जावेद शाह यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने परिसराला भेट दिली. तेव्हा त्यांनी एक पार्किंग अटेंडंट वाहन मालकाला त्याची कार पार्किंगजवळ (Vehicle Parking) थांबवण्याचा इशारा करताना पाहिले, त्यानंतर त्याने त्याच्याकडून १०० रुपये घेतले. तेव्हा पथकाने त्या अटेंडंटला ताबडतोब ताब्यात घेतले, अशी माहिती आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी त्याच्याकडे पार्किंगची कागदपत्रे मागितली असता, तो काहीही दाखवू शकला नाही, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. “आम्ही सहाय्यक आयुक्त, ए वॉर्ड यांनाही पत्र लिहिले आहे, त्यांना पार्किंग विनामूल्य असल्याचे बॅनर आणि फलक दिसतील अशा परिसरात ठळकपणे लावण्याचे आवाहन केले आहे. विनामूल्य पार्किंग असे लिहिलेले एक पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले असले तरी ते पोस्टर वाहन चालकांना दिसून येत नाही आणि पार्किंग माफियाकडून हे पोस्टर अर्धवट फाडण्यात आले आहे.

तक्रार करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन 

या ठिकाणच्या पार्किंगचे कंत्राट संपुष्टात आले आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत, त्या ठिकाणी मोफत कार पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याप्रमाणे या ठिकाणीही मोफत कार पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याबाबत लोकांना अवगत करण्यासाठी तिथे फलक लावण्यातही आले होते. मात्र हे फलक कोणी फाडले याची कल्पना नसल्याने या प्रकाराबाबत पोलिसांना एफआयआर दाखल करून घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे. दरम्यान, या ठिकाणी नवीन कंत्राटदार तथा संस्थेची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरू असून एक दोन दिवसात या ठिकाणी नवीन संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. या संस्थेच्या नियुक्तीनंतर त्या ठिकाणी महापालिकेच्या नियमानुसार शुल्क आकारले जाईल. नियमानुसार शुल्काची आकारणी संस्थेकडून केली जाणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या वतीने आकारण्यात येणाऱ्या शुल्काची माहिती फलकावर प्रसिद्ध केलेली आहे. जर त्यापेक्षा जास्त शुल्क आकारले जात असल्यास वाहनचालक तथा मालक यांनी महापालिका किंवा पोलिसात तक्रार द्यावी, असे महापालिकेच्या ए विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.