- सचिन धानजी,मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत मनसैनिकांना विधानसभेच्या कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर आता प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये मनसेची बांधणी सुरु झाली आहे. त्यामुळेच उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघामध्येही मनसेची बांधणी सुरु झाली असून भांडुपमध्ये दोनच दिवसांपूर्वी ईशान्य मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी उपस्थित राहत या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले असून कोटेचा यांना निवडून आणण्यासाठी मनसैनिकांनी कामाला लागण्याचे आवाहन मनसेच्या लोकसभा निरिक्षकांकडून केले जात आहे. (MNS)
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भांडुप आणि विक्रोळी हे मतदार संघ मनसेचे गड मानले जात असून या मतदार संघातही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे प्राबल्य असल्याचे बोलले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नरेंद्र मोदी यांच्यासासाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भांडुप येथे ईशान्य मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे या लोकसभा मतदार संघातील विभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्षांसह पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. (MNS)
(हेही वाचा – Malaria प्रसार साखळी तोडण्यासाठीच्या संशोधनावर अधिकाधिक भर देण्याची गरज – डॉ. श्रीनिवास)
या पदाधिकारी मेळाव्यात मनसेचे नेते शिरीष सावंत आणि कामगार नेते मनोज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनीही उपस्थिती लावत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मनसेच्या या पदाधिकारी मेळाव्यात मला सहभागी होता आले आणि माझी भूमिका मांडता आली याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विकसित भारत संकल्पनेची माहिती दिली. यावेळी भाजपाचे माजी मंत्री प्रकाश शहा, आमदार पराग शहा, राम कदम, माजी आमदार मंगेश सांगळे, मनसेच्या अनिषा माजगावकर, सत्यवान दळवी, सुचिता शिंदे, दशरथ शिर्के, संदीप जळगावकर, राजेश चव्हाण, विश्वजित ढोलम, गणेश चुग्गल, वैष्णवी सरफरे, प्रियंका श्रृंगारे कविता राणे, रंजना गायकवाड आदींसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. (MNS)
मनसेचा भाजपाला पाठिंबा देण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा मेळावा असला तरी आता विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेऊन संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निहाय पदाधिकारी गटाध्यक्षांचा बैठका घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन प्रत्येक मनसैनिकांकडून व्हावे याचसाठी हे मेळावे तसेच बैठका घेतल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठका व मेळाव्यांमधून पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावरही भर दिला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दर्शवल्यामुळे उबाठा शिवसेनेकडून तसेच काँग्रेस पक्षाकडून अपप्रचार सुरु करून मनसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याबाबतची भूमिका प्रत्येक मनसैनिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला जात असल्याचे दिसून येत आहे. (MNS)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community