Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवरील निर्बंधांचा ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Kotak Mahindra Bank : २४ एप्रिलला रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर नवीन ऑनलाईन ग्राहक घेणं तसंच क्रेडिट कार्ड व्यवसायावर निर्बंध लावले आहेत. 

197
Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवरील निर्बंधांचा ग्राहकांवर काय परिणाम होणार?
  • ऋजुता लुकतुके

कोटक महिंद्रा बँकेवर (Kotak Mahindra Bank) रिझर्व्ह बँकेनं २४ एप्रिलपासून काही मोठे निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, बँक इथून पुढे ऑनलाईन पद्धतीने किंवा डिजिटल माध्यमातून आलेले नवीन ग्राहक जोडू शकत नाही. तसंच कंपनीला नवीन क्रेडिट कार्ड वाटप करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कंपनीच्या माहिती-तंत्रज्ञान यंत्रणेत असलेल्या त्रुटी आणि त्यावर वेळेवर उपाययोजना करण्याच्या बाबतीत बँकेनं केलेली दिरंगाई यामुळे बँकेवर ही कारवाई करत असल्याचं मध्यवर्ती बँकेनं म्हटलं होतं. (Kotak Mahindra Bank)

बँकेनं आपल्याकडून तातडीने स्पष्टीकरण दिलं असलं आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांना धरून कार्यप्रणालीत बदल करण्याची तयारी दाखवली असली तरी या निर्बंधांमुळे ग्राहकांचा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. खासकरून बचत खातेधारक, मुदतठेवीधारक, कर्ज खातेधारक आणि क्रेडिट कार्डधारक यांच्या मनातील काही प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न इथं करत आहोत. जे सध्याचे खातेधारक आहेत, त्यांना बँक पूर्वीसारखीच सेवा पुरवणार आहे. त्यांना अडचण येणार नाही. पण, काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. (Kotak Mahindra Bank)

प्रश्न १. सध्याच्या ग्राहकांवर रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांचा काय परिणाम होईल? सध्याच्या ग्राहकांना डिजिटल सेवा वापरता येतील का?

उत्तर – बचत खातं, पगार जमा करण्याचं खातं, क्रेडिट कार्ड खातं किंवा कर्जाचं खातं असेल तरीही चालू खात्यांना कुठलाही अडथळा येणार नाही. या बाबतीत कोटक महिंद्रा बँकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, ‘क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग तसंच ऑनलाईन बँकिंग करणाऱ्या सध्याच्या ग्राहकांना आम्हाला आश्वस्त करायचं आहे की, तुमच्या सेवेत कुठलीही अडचण येणार नाही. या सर्व सेवा सुरूच राहतील.’ (Kotak Mahindra Bank)

प्रश्न २. क्रेडिट कार्डाच्या मागणीचं काय होईल?

उत्तर – रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी मनाई केली आहे. पण, तुमचा अर्ज जुना असेल आणि बँकेनं तुमचा अर्ज रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घालण्यापूर्वीच मंजूर केला असेल तर तुम्हाला तुमचं कार्ड मिळू शकेल. अशा ग्राहकांनी त्यांच्या अर्जाचं ताजं स्टेटस एकदा चेक करावं. (Kotak Mahindra Bank)

प्रश्न ३. २३ एप्रिल २०२४ रोजी बचत खातं, करन्ट खातं, यासाठी अर्ज केला असेल तर काय होईल?

उत्तर – २३ एप्रिलपासून रिझर्व्ह बँकेचे निर्बंध लागू झाले असले तरी ते नवीन अर्जधारकांना लागू होतील. त्यामुळे २३ तारखेला ज्यांचे अर्ज आले असतील ते बँक स्वीकारू शकेल. तशी कायद्यानेही परवानगी आहे. पण, बँक या अर्जांवर अंमलबजावणी करते का, हे ही पाहावं लागेल. त्यासाठी बँकेच्या शाखेत जाऊन चौकशीच करणे योग्य. (Kotak Mahindra Bank)

प्रश्न ४. वेयक्तिक कर्जासाठी ऑनलाईन केलेल्या अर्जाचं काय होईल?

उत्तर – तुम्ही २४ एप्रिल पूर्वी ऑनलाईन अर्ज केलेला असेल, पण, बँकेनं तो अजून मंजूर केलेला नसेल तर बँक कदाचित या अर्जावरील कारवाई थांबवू शकते. अशावेळी तुमचा अर्ज अडकून पडेल. पण, तुम्ही बँकेच्या संबंधित शाखेत आपल्या अर्जाची चौकशी करू शकता.

दुसरं म्हणजे, डिजिटल माध्यमातून आता बँकेला काम करता येणार नसल्यामुळे ही प्रक्रिया ऑफलाईन आणि थोडी जटील होण्याची शक्यता आहे. तुमचं काम रखडू शकतं. (Kotak Mahindra Bank)

प्रश्न ५. माझं कोटक बँकेत बचत खातं/पगाराचं खातं आहे. मला वैयक्तिक कर्ज मिळू शकेल का?

उत्तर – नाही. तुम्ही ऑनलाईन कुठल्याही प्रकारचं खातं कोटक महिंद्रा बँकेत सध्या उघडू शकत नाही. तुमचं मूळात बचत खातं असलं तरी कुठल्याही कर्जाचं खातं हे नवीन असतं. आणि सध्या ऑनलाईन पद्धतीने कुठलंही नवीन खातं उघडण्याची बँकेला परवानगी नाही. त्यामुळे तुम्ही वैयक्तिक कर्जाची प्रक्रियाही ऑनलाईन सुरू करू शकत नाही. (Kotak Mahindra Bank)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.