Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबईत मानस कन्येला निवडून आणण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक करणार हाताला मतदान

उत्तर मध्य मुंबई या मतदार संघातून वर्षा गायकवाड यांनी निवडणूक लढवावी अशाप्रकारची इच्छा खुद्द उबाठा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचीच होती. त्यांच्या इच्छेनुसारच गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

223
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्यावतीने वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जावून शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. सन २०१९ नंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी झाल्यापासून  धारावीच्या आमदार या मातोश्रीच्या अगदी जवळ गेल्या आहेत. त्यानंतर पक्ष फुटल्यानंतर धारावी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून गायकवाड आणि ठाकरेंमधील कुटुंबस्नेह अधिकच वाढला आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड या ठाकरेंच्या मानस कन्याच जणू बनल्या असून या आपल्या मानस कन्याला निवडून आणण्यासाठी ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांना हाताला मतदान करून त्यांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

उत्तर मध्य मुंबईतील पक्षीय बलाबल 

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार पुनम महाजन यांना भाजपा पुन्हा संधी देते की त्यांचा पत्ता कापते याबाबत चर्चा रंगल्या जात असल्या तरी अद्यापही भाजपाला आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही. मात्र, या मतदार संघाची जागा काँग्रेसला सुटल्यानंतर या जागेवर काँग्रेसच्या वतीने वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  त्यामुळे मातोश्रीच्या या अंगणातील मतदार संघात वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत. या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना,  कुर्ला, चांदिवली, विलेपार्ले हे सहा विधानसभा क्षेत्र असून त्यात भाजपाचे दोन, काँग्रेसचा एक आणि शिवसेना उबाठा एक आणि शिवसेनेचे दोन अशाप्रकारे आमदारांचे पक्षीय संख्याबळ आहे. त्यातील काँग्रेसचे झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिध्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या केवळ एकमेव आमदाराचे वजन या मतदार संघात आहे.

उबाठाचे शिवसैनिक कॉँग्रेसला मत देणार 

मात्र, या लोकसभा मतदार संघात सन २०१४ पूर्वी काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि त्यापूर्वी सुनील दत्त हे निवडून आले होते. मात्र, या लोकसभा मतदार संघात सुनील दत्त यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर याठिकाणी झालेल्या पोट निवडणुकीत मधुकर सरपोतदार हे प्रथमच शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. त्यामुळे हा अपवाद वगळता आतापर्यंत या मतदार संघातील शिवसैनिकांना कमळ चिन्हाला मतदान करता आलेले आहे. परंतु यंदा उबाठा शिवसेना महाविकास आघाडीत सामील असल्याने काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याने उबाठा शिवसैनिकांना हाताला मतदान करावे लागणार आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : मिहिर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज दाखल)

या लोकसभा मतदार संघातील वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, चांदिवली, कुर्ला पूर्व, कुर्ला पश्चिम, कलिना आदी भागांमधील मुस्लिम मतदार तसेच उत्तर भारतीय आणि शिवसैनिकांची मते अधिक असल्याने गायकवाड यांनी या मतदार संघाची  निवड केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या मतदार संघातून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी निवडणूक लढवावी अशाप्रकारची इच्छा खुद्द उबाठा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचीच होती. त्यांच्या इच्छेनुसारच गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

त्यामुळे यंदा उत्तर मध्य मुंबईतील उबाठा शिवसैनिकांना कमळ ऐवजी हाताला मतदान करण्याची वेळ आली आहे. एकेकाळी कडवट हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसैनिकांना आता चक्क हाताला मतदान करण्याची वेळ आली असून खुद्द बाळासाहेबांचे पुत्र असलेले उध्दव ठाकरे हेही प्रथमच हाताला मतदान करणार आहेत. मात्र,  शिवसैनिकांना हाताला मतदान करणे मान्य नसून काही शिवसैनिकांनी तर यापेक्षा मतदान न  करता घरीच बसणे योग्य ठरेल अशीच भावना व्यक्त केली. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून जर आमचा पक्ष किंवा भाजपा नसेल तर आजवर ज्याच्या विरोधात मतदान केले, त्याच्याबाजुने मतदान करणार कसे असा सवालही शिवसैनिकांनी केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.