(वादळ इला आणि गेला…पण मागील तीन दिवसांत राजकारण्यांनी कोकणात आपल्या दौऱ्याचो नुसतो खच पाडल्यानी…मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षनेते कोकणात इले खरे पण ह्या नेत्यांच्या दौऱ्याचो फायदो खराच कोकणी जनतेक होतलो मा असो प्रश्न मात्र कोकणातल्या लोकांका पडलो हा)
कोकण…निसर्ग सौंदर्यांने नटलेली अशी ही परशुरामाची भूमी…पण याच परशुरामाच्या भूमिला कुणाची नजर तर लागली नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कधी पावसामुळे आलेला पूर, कधी अचानक पडणारा पाऊस तर अधेमधे येणारी वादळं. गेल्यावर्षी तर निसर्ग चक्री वादळाने अलिबाग येथील शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. तेच संकट यंदाही कोकणावर आले. यंदा वादळाचे नाव जरी बदलेले असले तरी नव्या रुपात आलेल्या या तौक्ती चक्रीवादळाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरते उद्ध्वस्त केले आहे. कुणाची नाराळाची झाडे, कुणाचे घर, कुणाची आब्यांची बायागत होत्याची नव्हती झाली. सर्वच नेत्यांनी कोकणात पहाणी दौरे लागलीच सुरु केले, पण आता या नेत्यांच्या दौऱ्याचा कोकणी जनतेला खरच फायदा होणार का?, असा प्रश्न मात्र कोकणी जनतेला पडू लागला आहे.
मुख्यमंत्री आले अन् गेले!
शिवसेना आणि कोकणाचे अतूट नाते…कोकणी जनतेने शिवसेनेला भरभरून दिले. मग या वादळाच्या वेळी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते तरी कसे कोकणी जनतेवर पाठ फिरवतील. त्याचमुळे मुख्यमंत्री हे सुरुवातीला कोकणात दोन दिवसांसाठी येतील, अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी अवघ्या चार तासांचा दौरा करत कोकणाला मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या चार तासांच्या दौऱ्याची चर्चा मात्र जोरदार होऊ लागली असून, ते आले अन् लगेच गेले, पदरी काय पडले?, असा सवाल मात्र नुकसान झालेल्या कोकणी जनतेला पडला आहे. मात्र या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल येताच कोणत्या स्वरूपाची मदत जाहीर करायची याचा निर्णय घेऊन मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले पण आता ही मदत कधीपर्यंत मिळणार हे पाहावं लागेल. तर त्यांनी या दौऱ्यात विरोधकांच्या देखील आरोपांना उत्तर दिले आहे. मी इथे कोकणच्या मदतीसाठी आलो आहे. फोटो सेशन करायला आलो नाही. तसेच मी पायी दौरा करत आहे, हेलिकॉप्टरने फिरत नाही. त्यामुळे ४ तासांचाच दौरा केला, मात्र त्यातही महत्वाच्या भागांना भेटी दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर टोला हाणला.
विरोधकांचा तीन दिवसांचा दौरा
एकीकडे मुख्यमंत्री चार तासांचा पहाणी दौरा करून गेले असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपला सर्व लवाजमा घेत कोकणात दिवसांचा दौरा करून निघून गेले. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी तर गेल्या वर्षी निसर्ग चक्री वादळा वेळी सरकारने मदत जाहीर केली होती. परंतु ती अद्याप कोकणवासीयांपर्यंत पोहचली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेंट करण्यात व्यस्त आहेत. पण नुकसानग्रस्त भागात मदतीचा दुष्काळ मात्र त्यांना दिसत नाही, अशी टीका करत मुख्यमंत्र्यांना निसर्ग चक्रीवादळाच्या जाहीर केलेल्या मदतीची आठवण करून दिली.
(हेही वाचा : धक्कादायक! रोहयो मंत्र्याच्या गावातच रोजगार हमीचे बोगस कामगार!)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला फटका
तौक्ते चक्री वादळाचा सर्वाधिक फटका हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना बसला. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350 घरे, खेड तालुक्यात 30 घरांचे, गुहागर 05 घरे, चिपळूण 65 घरे, संगमेश्वर 102 घरे, रत्नागिरी 200 घरे, राजापूर 32 असे एकूण जिल्ह्यांत 1,028 घरांचे तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागर येथे 1, संगमेश्वर येथे 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 व्यक्ती जखमी झाल्या असून गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वरमध्ये 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्यांचे 09 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 800 ते 1000 घरांचे नुकसान झाले असून, शेतीचे 3 ते 4 हजार हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे.
कोकण अजूनही अंधारात
तौक्ती चक्रीवादळामुळे अनेक ठिकणी वीज वितरणाच्या तारा पडल्याने तर कुठे लाईटचे खांब पडल्याने पुरता कोकण अंधारात गेला होता. अजूनही कोकणातील काही भागांमध्ये लाईट नसून, कोकण अंधारात गेला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोबाईलचे नेटवर्क देखील गायब झाले असून, ही समस्या आणखी काही दिवस तरी राहणार आहे.
Join Our WhatsApp Community