Maha Vikas Aghadi: ‘मविआ’ला ‘वंचित’चा किंचित फायदा

वंचित बहुजन आघाडीचे ३४ उमेदवार रिंगणात : २ ठिकाणी मदत तर ९ जागांवर आघाडीला फटका बसण्याची चिन्हे

150
Maha Vikas Aghadi: ‘मविआ’ला ‘वंचित’चा किंचित फायदा

>> सुजित महामुलकर

वंचित म्हणजे हे महाविकास आघाडीसाठी किंचित आणि महायुतीसाठी संचित, ठरण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Maha Vikas Aghadi)

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात ३४ उमेदवार उभे केले असून सहा मतदारसंघात अन्य पक्षांना पाठींबा जाहीर केला आहे. यापैकी जवळपास नऊ मतदारसंघात मतविभागणीची शक्यता अधिक असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना ऊबाठा यांच्या महाविकास आघाडीतील उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो.

नऊ मतदारसंघात मतविभागणी
यात प्रामुख्याने अकोला मतदारसंघ असून या जागेवर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीकडून भाजपाचे अनुप धोत्रे आणि महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे अभय पाटील यांच्यासह एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आंबेडकर गेली अनेक वर्षे या मतदारसंघातून निवडणूक लढले असून एकदा जिंकून लोकसभेतही गेले आहेत. या मतदारसंघात ‘एमआयएम’ने आंबेडकर यांना पाठींबा दिला असल्याने काही प्रमाणात मुस्लिम मते वंचितच्या बाजूने वळू शकतात.

पुण्यात मोरे फॅक्टरचा धक्का
पुण्यात पूर्वाश्रमीचे मनसैनिक वसंत मोरे यांची उमेदवारी कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठींबा जाहीर केला असल्याने मनसेची मते मोरे यांना मिळतील, याची शाश्वती कमी असून दलित, ओबीसी आणि वंचित आघाडीची, एरव्ही कॉंग्रेसच्या पारड्यात जाऊ शकणारी मते, मोरे यांना मिळण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसैनिकांनी मनसेतून बाहेर पडलेल्यांना अजिबात मदत न करता त्यांच्या विरोधात काम करणार असल्याचे जाहीर केल्याने, महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांचे पारडे जड असल्याचे चित्र मतदारसंघात आहे.

कॉंग्रेसी रूपवते
काही दिवसांपूर्वी, कॉंग्रेसच्या महासचिव असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून वंचितमध्ये प्रवेश केला. वंचित आघाडीनेही आरक्षित असलेल्या शिर्डी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देऊन बाजी मारली. या मतदारसंघात शिवसेनेकडून (शिंदे) सदाशिव लोखंडे आणि शिवसेना ऊबाठाकडून भाऊसाहेब वाकचौरे निवडणूक रिंगणात आहेत. रूपवते यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होईल पण उत्कर्षा या मुळच्या कॉंग्रेसी असल्याने दलित आणि कॉंग्रेसची मते खेचून घेण्यात यशस्वी होऊ शकतात. तर मतविभागणीचा फायदा लोखंडे यांच्या पथ्यावर पडेल.

माढ्यात राष्ट्रवादी ‘शप’ला फटका
माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीत प्रवेश करून तिकीट मिळवले. रामटेक मतदारसंघात वंचितने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, बीडमध्ये अशोक हिंगे पाटील आणि नाशिकला सकल मराठा समाजमधील सक्रिय कार्यकर्ता करण गायकर यांना उमेदवारी देऊन कुणबी आणि मराठा मतांमध्ये फूट पाडण्याची रणनीती आखली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुक काळात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २०१९ इतका प्रभाव वंचितचा असेल याबाबत शंका उपस्थित केली जात असली तरी वंचित आघाडीच्या मतांकडे दुर्लक्ष करून निवडणूक विश्लेषण करता येऊ शकणार नाही.

अमरावतीतही आंबेडकर
याशिवाय वंचित आघाडीने अमरावती मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांचे बंधु रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना पाठींबा जाहीर केला आहे.अमरावती मतदारसंघात महायुतीच्या नवनीत राणा उमेदवार असून महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे निवडणूक लढवत आहेत. बच्चू कडू यांच्या प्रहार जनाशक्ती पक्षाचे दिनेश बूब हे देखील निवडणूक रिंगणात आहेत. तसेच यवतमाळ-वाशिम मतदारसंघात समनक जनता पार्टीचे अनिल राठोड यांना वंचितने पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील उबाठाचे उमेदवार संजय देशमुख यांची मते फुटून महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना लाभ होऊ शकतो.

दोन कुटुंबांना फायदा
अशा नऊ मतदारसंघात वंचितचा महाविकास आघाडीला फटका बसू शकतो तर केवळ दोन म्हणजे कोल्हापूर आणि बारामती मतदारसंघात महाविकास आघाडीला वंचितची मदत होऊ शकते. महाविकास आघाडीचे उमेदवार, कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसकडून शाहू छत्रपती तर बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या दोन जागांवर महाविकास आघाडीला किंचित फायदा होऊ शकतो.

२०१९ चा इतिहास
गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला वंचितचा मोठा फटका बसला होता. काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांसह अन्य काही उमेदवारांना पाच वर्षे दिल्लीपासून लांब राहावं लागलं, हे गेल्या निवडणुकीत दिसून आले. मागच्या लोकसभा निवडणूकीत नांदेडचे तत्कालीन काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण आणि सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे त्याचप्रमाणे गडचिरोलीचे काँग्रेस उमेदवार नामदेव उसेंडी, हातकनंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव हा केवळ वंचितच्या मतांमुळे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच ४० मतदारसंघात वंचितने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. चंद्रपूर, गडचिरोली, हातकनंगले, हिंगोली, नांदेड, परभणी, सोलापूर या मतदार संघांत लाखाच्या वर मते घेतली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.