Lok Sabha Election : सोलापुरात भाजपा हॅट्ट्रिक करणार की हुकणार?

198

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) सोलापूर लोकसभा मतदारसंघ तसा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला, पण गेल्या काही निवडणुकांपासून हे चित्र बदलले. नेहमी काँग्रेसचा खासदार असणाऱ्या या मतदारसंघात भाजपाने जोरदार मुसंडी घेतली. विशेषतः २०१४ पासून सलग दोन वेळा भाजपाचाच खासदार या मतदारसंघाने दिला आहे, परंतु यंदाची परिस्थिती वेगळी दिसत आहे. यावेळी २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अंतिम क्षणी उमेदवारी मागे घेतल्यामुळे यंदा भाजपा  विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे.

भाजपाकडून आमदार राम सातपुते आणि काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होत आहे. वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे वंचितने ऐनवेळी अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पुरस्कृत केले आहे. यावेळी सोलापूरमध्ये वंचित फॅक्टर चालण्याची चिन्हे नाहीत.

(हेही वाचा Devendra Fadnavis: माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास)

सुशीलकुमार शिंदे यांची कन्या, तीन वेळा आमदार या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्याचबरोबर भाजपाच्या पूर्वीच्या दोन्ही खासदारांच्या अकार्यक्षमतेचा भाजपाला फटका बसू शकतो. भाजपाने उमेदवार उशिरा घोषित केला होता. तोपर्यंत प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात किमान एक ते दोन प्रचार फेऱ्या झाल्या होत्या. सोशल मीडियावर दोन्ही उमेदवारांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार केला जात आहे. काँग्रेसच्या प्रचारात बेरोजगारी, महागाई आणि स्थानिक विकासाचे मुद्दे आणले जात आहेत, तर भाजपाकडून राम मंदिर, दहशतवाद, मोदींचा करिष्मा, हिंदुत्वासारखे मुद्दे आणले जात आहेत. सातपुते हे आक्रमक पद्धतीने भाषण करतात. प्रचाराच्या वेळी स्थानिक प्रश्न आल्यास ते थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावतात. त्यामुळे त्याचाही मतदारांवर परिणाम होताना दिसतो, परंतु मराठा मतांची विभागणी तसेच मागील वेळी वंचितला गेलेल्या मतांचा फायदा भाजपाला होईल की काँग्रेसला याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

लिंगायत समाजाचे प्राबल्य

२०१९ च्या तुलनेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात १ लाख ८० हजार २६१ मतदार वाढले आहेत. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या ही २० लाख ३२ हजार ९८५ इतकी झाली आहे. या मतदारसंघात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर मराठा, धनगर, बौद्ध, मुस्लीम आणि पद्मशाली समाज असा क्रम लागतो. लिंगायत समाजाचे प्राबल्य येथे दिसून येते. आतापर्यंत या समाजाची बहुतांश मते भाजपाच्या बाजूने राहिली आहेत.

महायुतीचे ५ आमदार

या मतदारसंघांतर्गत मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर- मंगळवेढा अशा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील केवळ सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात स्वतः उमेदवार प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या आमदार आहेत. उर्वरित पाचही मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत.

मतांची टक्केवारी

२०१४ मध्ये शरद बनसोडे यांना ५,१७,८७९ म्हणजे ५४.४३ टक्के मते मिळाली होती. त्याचवेळी सुशील कुमार शिंदे यांच्या मताधिक्यात त्यावेळी तब्बल १३.४५ टक्क्यांची घट झाली होती, तर २०१९ च्या निवडणुकीवेळी भाजपाचे जयसिद्धेश्वर स्वामी यांना ५,२४,९८५ मते मिळाली, तर सुशीलकुमार शिंदे यांना ३,६६,३७७ आणि प्रकाश आंबेडकर यांना १,७०,००७ मते मिळाली. शिंदे यांचा सुमारे १ लाख ५८ हजार मतांनी पराभव झाला होता. तिरंगी लढतीमुळे शिंदे यांना पराभव सहन करावा लागला होता. यंदा सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि सोलापूर शहर मध्यच्या सलग तीन वेळा आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे आणि माळशिरसचे भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत होत आहे.

(हेही वाचा Covishield Vaccine: कोविशिल्ड वॅक्सिनमुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका, कंपनीने मान्य केली दुष्परिणामांची शक्यता)

काँग्रेसच्या हातून मतदारसंघ निसटला

काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघाला पहिल्यांदा १९९६ साली भाजपाचे लिंगराज वल्याळ यांनी खिंडार पाडले, परंतु नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला. काँग्रेसच्या हायकमांडने सुशीलकुमार शिंदेंकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. त्यामुळे शिंदे यांना लोकसभेचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपामध्ये येऊन प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसचे निष्ठावंत आनंदराव देवकते यांचा पराभव केला. त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपाने विजय मिळवला. त्यावेळी तर शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा भाजपाचे सुभाष देशमुख यांनी अवघ्या ५ हजार मतांनी पराभव केला. २००९ साली मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचला. त्यांनी राजकारणात नवखे असलेले भाजपाचे शरद बनसोडे यांचा पराभव केला. २०१४ मध्ये भाजपाने पुन्हा बनसोडे यांना उमेदवारी दिली. यावेळी मात्र शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला. मोदी लाटेत शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचा पराभव झाला. २०१९ मध्ये मतदारसंघात बनसोडेबद्दल नाराजी होती. त्यावेळी भाजपाने उमेदवारच बदलला. भाजपाने जातीय समीकरणे लक्षात घेऊन जयसिद्धेश्वर महाराज यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून पुन्हा सुशीलकुमार शिंदे हेच उमेदवार होते. वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हेही इथून उभे होते. परिस्थिती शिंदे यांच्यासाठी अनुकूल होती, परंतु मतविभाजनाचा फटका त्यांना बसला. जयसिद्धेश्वर महाराज विजयी झाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.