मुंबई महापालिकेने २२ हजार ७७४ शौचालय उभारणीचा निर्णय घेतला असला तरी दीड वर्ष उलटूनही केवळ ३४ टक्के शौचकुपांचे काम पूर्ण झाले आहे. मे २०२१ अखेर पर्यंत महापालिकेच्यावतीने सुमारे आठ हजार शौचकुपांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत शौचकुपांची ही सर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प महापालिकेने जाहीर केला. पण तरी पावसाळा लक्षात घेता सुमारे साडेअकरा हजार शौचकुपांचे बांधकाम पूर्ण होणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.
५० टक्के काम प्रगतीपथावर
संपूर्ण मुंबईत वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत एकूण २२ हजार ७७४ शौचालयांकरता निविदा काढून, त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये ८ हजार ६३७ ही नवीन शौचकुपे आणि १४ हजार १३७ जुन्या शौचकुपांच्या जागी पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी ८७५ ठिकाणी २० हजार ३०१ शौचकुपांचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यापैकी ३५३ ठिकाणी ७ हजार ९५३ शौचकुपे बांधून तयार झाली आहेत, तर उर्वरित ४७५ ठिकाणी ११ हजार ५६२ शौचकुपांचे बांधकाम चालू असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. त्यामुळे केवळ ३४ टक्केच काम पूर्ण झाले असून, ५० टक्के काम प्रगतीपथावर आहे.
(हेही वाचाः शौचालयाने उजळला परिसर!)
गोवंडी, देवनारमध्ये सर्वाधिक शौचालयांची कामे पूर्ण
गोवंडी, देवनार, शिवाजीनगर आदी एम-पूर्व विभागातील २८३ ठिकाणी ६ हजार ६०७ शौचालयांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ९० ठिकाणी १ हजार ८७९ शौचकुपांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संपूर्ण मुंबईतील शौचकुपे बांधकामात एम पूर्व विभाग प्रथम क्रमांकावर आहे. या विभागातच सर्वाधिक शौचकुपे उभारली गेली आहेत. त्या खालोखाल एल विभागाचा समावेश आहे. कुर्ला ‘एल’ विभागात ५० ठिकाणी ९३८ शौचकुपांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर मालाड पी उत्तर विभागात ४१ ठिकाणी १ हजार २६२ शौचकुपांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
मुंबईतील ९७६ शौचकुपांबाबत अद्यापही निर्णय नाही
मुंबईत २२ हजार ७७४ शौचकुपांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यातील प्रत्यक्षात २० हजार ४०६ शौचकुपांचेच प्रत्यक्षात बांधकाम केले जाणार आहे. तर यातील ९७६ शौचकुपांच्या बांधकामाबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारचे आदेश जारी झालेले नाहीत.
(हेही वाचाः धारावीत एका शौचालयावर एक कोटींचा खर्च!)
Join Our WhatsApp Community