सांगली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दर्शवला असून मुंबईतील दोन जागांवरही उमेदवार जाहीर केले. दक्षिण मुंबई मतदार संघातून वंचितने अफजल दाऊदनी यांना उमेदवारी दिली असून उत्तर-मध्य मतदार संघात संतोष अंबुलगे आणि कल्याणमधून जमील अहमद यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. वंचितने घोषित केलेल्या उमेदवाऱ्या महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. (Vanchit Bahujan Aghadi)
बंडखोराला पाठिंबा
सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे विशाल पाटील महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले असून काँग्रेसचा त्यांना अंतर्गत पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघात शिवसेना उबाठाने परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे काँग्रेसच्या पाटील यांनी बंडखोरी केली असून काँग्रेसचा पूर्ण पाठींबा असल्याचे चित्र सांगलीत आहे. (Vanchit Bahujan Aghadi)
(हेही वाचा – तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा; Amol Kolhe यांचे अजित पवारांना खुले आव्हान)
दलितविरुद्ध मराठा समिकरणात वंचितची उडी
दरम्यान, वंचित आघाडीने मुंबईत दोन मतदार संघात उमेदवार देऊन महायुतीचे काम हलके केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. उत्तर मध्य मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात भाजपाने नामवंत वकील उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले आहे. या दलितविरुद्ध मराठा जातीच्या समिकरणात वंचितने उडी घेत संतोष अंबुलगे या बौध्द् उमेदवाराला संधी दिली. यामुळे वर्षा गायकवाड यांच्या मतांमध्ये विभागणी होऊ शकते. (Vanchit Bahujan Aghadi)
दक्षिण मुंबईत उबाठाला फटका
काँग्रेससोबत गेल्यापासून मुस्लिम समाज शिवसेना उबाठा गटाच्या अधिक जवळ आला आहे. मुंबई दक्षिण मतदार संघात भायखळा आणि मुंबादेवी या दोन मतदार संघात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोकसंख्या असून वंचितच्या उबाठाच्या अफजल दाऊदनी या खोजा-शिया मुस्लिम समाजाच्या उमेदवारामुळे उबाठाच्या अरविंद सावंत यांना फटका बसू शकतो. दक्षिण मुंबईतून शिवसेनेतर्फे आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Vanchit Bahujan Aghadi)
शिदे यांचा मार्ग सुकर
कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार आहेत. या मतदार संघात शिवसेना उबाठाच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित आघाडीने या मतदार संघात जमील अहमद यांना उमेदवारी देऊन शिदे यांचा मार्ग सुकर केल्याचे स्पष्ट होते. (Vanchit Bahujan Aghadi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community