वसंतराव देशपांडे (Pandit Vasantrao Deshpande) हे संगीत नाटकांमध्ये योगदान देणारे प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक होते. पंडित वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी महाराष्ट्रातील विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ ब्राह्मण होते.
वसंतराव देशपांडे अगदी लहानपणापासूनच खूप प्रतिभाशाली होते. ते आठ वर्षांचे असताना भालजी पेंढारकर यांनी त्यांना पाहिले आणि त्यांच्या ठायी असलेली प्रतिभा अचूक हेरली. भालजी पेंढारकर यांनी वसंतराव देशपांडेंना (Pandit Vasantrao Deshpande) आपल्या १९३५ साली प्रदर्शित झालेल्या कालिया मर्दन या हिंदी चित्रपटात कृष्णाची भूमिका दिली आणि वसंतराव देशपांडे यांनी ती भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारली.
(हेही वाचा भारतात काँग्रेसचे कमकुवत सरकार येण्यासाठी पाकिस्तान प्रार्थना करतेय; PM Narendra Modi यांचा घणाघात)
वसंतराव देशपांडे यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या वेगवेगळ्या घराण्यातील गुरूंकडून आपले शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. सुरुवातीला वसंतरावांनी पंडित व्ही.डी. पलुस्कर यांचे शिष्य ग्वाल्हेरच्या पंडित शंकरराव सप्रे यांच्याकडे नागपुरात शास्त्रीय संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत सी. रामचंद्र हे सुद्धा पंडित शंकरराव सप्रे यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेत होते.
पंडीत शंकरराव सप्रे यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर वसंतराव देशपांडे यांनी किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खान, पटियाला घराण्याचे असद अली खान, भेंडीबाजार घराण्याचे अमान अली खान आणि अंजनीबाई मालपेकर आणि रामकृष्णबुवा वझे यांच्यासोबतच अनेक दिग्गज संगीतकारांकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर हे वझेबुवांचे थेट शिष्य होते. पंडित वसंतराव देशपांडेंवर (Pandit Vasantrao Deshpande) त्यांचाही पुष्कळ प्रभाव होता. त्यांनी दिनानाथ मंगेशकर यांच्या गायनाची उत्कृष्ट नाट्यमय गायनशैली अगदी सहज अंगिकारली होती. पंडित वसंतराव देशपांडे यांना मंगेशकरांच्या संगीताचे वारसदार म्हणूनही ओळखले जाते.
पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे हे सुद्धा प्रसिद्ध गायक आहेत. राहुल देशपांडे यांनी नाटकांतून आणि चित्रपटांतून आपले आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या भूमिकांची पुनरावृत्ती केलेली आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे कट्यार काळजात घुसली हा चित्रपट. तसेच पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेला मी वसंतराव हा चित्रपट होय. या चित्रपटात राहुल देशपांडे यांनी वसंतराव देशपांडे यांची भूमिका साकारली आहे.
Join Our WhatsApp Community