राज्यात ठाकरे सरकार सत्तेत येऊन आता दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात ठाकरे सरकारमधील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा संभ्रम निर्माण झाला होता. आता तर राज्यातील लॉकडाऊन वाढणार, की शिथिल होणार यावरील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या विधानांमुळे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ठाकरे सरकामधील काही मंत्री म्हणतात राज्यात १ जूनपासून शिथिलता येईल, तर काही मंत्री राज्यात आणखी लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असल्याची वक्तव्ये करू लागले आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल झालेल्या टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत लॉकाडऊन वाढण्याचे संकेत दिले होते.
मुख्यमंत्री म्हणतात कटूपणा आला तरी चालेल
टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले होते. राज्याच्या हितासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात कटूपणा घेण्याचीही आपली तयारी आहे, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच नागरिकांनी सहकार्य केले, पण अजूनही यश मिळालेले नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः …तर जून महिनाही लॉकडाऊनमध्ये जाणार!)
आदित्य ठाकरे यांनीही दिले संकेत
आठवड्याभरापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले होते. राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत घट होत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. या अनुषंगाने राज्यात १ जूनच्या पुढेही लॉकडाऊन वाढवला जाणार का, अशी विचारणा केली असता आदित्य यांनी त्यावर विस्तृत उत्तर दिले. लॉकडाऊन वाढवला जाणार किंवा नाही, हे पूर्णपणे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येवर अवलंबून असेल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेव्हाच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय सरकार घेईल. त्यातही नागरिकांच्या आरोग्यालाच पहिले प्राधान्य असेल व त्यानुसारच पुढचा निर्णय होईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
‘त्या’ प्रश्नाचे एकच उत्तर
राज्यात सध्या लॉकडाऊन असला तरी अर्थचक्र मात्र सुरू आहे. प्रमुख कार्यालये, उद्योगधंदे, आयात-निर्यात यावर कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत. केवळ अनावश्यक गोष्टींसाठी जे घराबाहेर पडतात, त्यांना अटकाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनावश्यक कारणासाठी घराबाहेर कधी जाता येणार, असा तुमचा प्रश्न असेल तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतरच, हेच त्यावर उत्तर असल्याचे आदित्य म्हणाले होते.
(हेही वाचाः लॉकडाऊन वाढणार का? काय म्हणाले आदित्य ठाकरे? )
काँग्रेस-राष्ट्रवादीला नको लॉकडाऊन
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजूनही लॉकडाऊनवर ठाम असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मात्र लॉकडाऊनला सुरुवातीपासून विरोध आहे. संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन करण्यावरुन ठाकरे सरकारमध्ये सुरुवातीला दोन गट पहायला मिळाले होते. तसेच लॉकडाऊन शिथिल करायचा का?, यावरुन देखील दोन मतप्रवाह दिसत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात येणार असल्याचे, स्पष्ट संकेत शनिवारी दिले आहेत. रुग्णसंख्या कमी होणाऱ्या शहरांत निर्बंध शिथिल करण्यात येणार असले, तरीही ते एकाच वेळी शिथिल होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले आहेत. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील नियम शिथिल झाले, तरी लोकल मात्र सुरू होणार नसल्याचे म्हटले आहे.
महिन्याभरापासून राज्यात लॉकडाऊन
एप्रिलमध्ये राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यात 15 मे रोजी पुन्हा 15 दिवसांनी वाढ करण्यात आली. महिन्याभरापासून सुरू असणा-या लॉकडाऊनचे आता काय होणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असताना मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये मात्र गोंधळ पहायला मिळत आहे.
(हेही वाचाः लॉकडाऊन वाढण्याचे संकेत? ‘या’ योजनेची मुदत वाढवली)
Join Our WhatsApp Community