केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १९ मे २०२१ रोजी दिलेल्या सूचनांनुसार, स्तनदा मातांनाही कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील शासकीय व महापालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन नोंदणी करणाऱ्या(वॉक इन) स्तनदा मातांना कोविड लस देण्यात येणार आहे. तर गरोदर महिलांनी स्त्री रोग तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आणि संमतीपत्र अशी दोन्ही कागदपत्रं लसीकरण केंद्रांवर येताना सोबत आणल्यास त्यांनाही थेट लस दिली जाणार आहे.
थेट लसीकरण केंद्रांवर नोंदणी करुन लस
स्तनदा मातांना लस देताना योग्य त्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याची दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे, तसेच वैद्यकीय माहिती समवेत बाळगणे आवश्यक आहे. आठवड्याच्या सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या विविध पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येते. त्यामध्ये आता स्तनदा मातांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांची लसीकरण केंद्रांमध्ये जागेवरच नोंदणी करुन, लागलीच त्यांना लस देण्यात येईल.
(हेही वाचाः मुलांच्या लसीकरणाला सहा महिन्यांचा अवधी! नवीन शैक्षणिक वर्षही विनाशाळेचे जाईल!)
गरोदर स्त्रियांना प्रमाणपत्र आवश्यक
गरोदर स्त्रियांना जर कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असेल, तर अशा गरोदर स्त्रियांना, त्यांच्यावर उपचार करणा-या स्त्री रोग तज्ज्ञाने त्यांच्या शीर्षपत्रावर (लेटरहेड), कोविड लस देण्याबाबत तसे लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल. असे प्रमाणपत्र गरोदर स्त्रियांनी स्वतः स्त्री रोग तज्ज्ञांकडून प्राप्त केल्यानंतर कोविड लस घेण्याबाबत स्वतःचे संमतीपत्र देखील द्यावे लागेल. स्त्री रोग तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आणि संमतीपत्र अशी दोन्ही कागदपत्रं लसीकरण केंद्रावर येताना सोबत आणावी आणि लसीकरण केंद्राकडे सुपूर्द करावी. त्यानुसार, त्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
Join Our WhatsApp Community