- ऋजुता लुकतुके
क्रिकेटमध्ये जगभरातच फ्रँचाईजी संघांचा समावेश असलेल्या टी-२० लीगचा धुमाकूळ वाढत आहे. पण, त्याचा फटका कसोटी क्रिकेटला बसताना दिसतो आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने एसए२० लीग स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत दुय्यम संघ उतरवल्याची घटना ताजी आहे. त्याचं उदाहरण देत विंडिज दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी थेट आयसीसीलाच साकडं घातलं आहे. ‘कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी आता तुम्हीच हस्तक्षेप करा,’ असं लाराचं म्हणणं आहे. (Brian Lara)
टी-२० लीग स्पर्धांचं प्रस्थ वाढतंय. आणि त्याच्या प्रभावाखाली कसोटी क्रिकेट झाकलं जातंय. कसोटी क्रिकेटला प्राधान्य आणि त्याचं महत्त्व टिकून रहावं यासाठी प्रयत्न करण्याचं काम आयसीसीचं आहे, असं लाराला वाटतं. ‘आता आयसीसीने पुढाकार घेऊन कसोटी क्रिकेट कसं अबाधित राहील. आणि त्यालाच प्राधान्य कसं मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांनी त्यासाठी एक निश्चित धोरणच आखलं पाहिजे. आतासारखा कसोटीचा ऱ्हास थांबला पाहिजे,’ असं लाराने पीटीआय वृत्तसंस्थेला अलीकडे दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवलं. (Brian Lara)
(हेही वाचा – Water Cut : येत्या शनिवारी ‘या’ भागातील राहणार पाणीपुरवठा बंद)
‘हे’ आहेत क्रिकेट जगतातील मोठे देश
आयसीसीने सुरू केलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं लाराने कौतुक केलं आणि कसोटी क्रिकेटही तरुण पिढीला आपलं वाटलं पाहिजे अशी इच्छा बोलून दाखवली. क्रिकेटपटू टी-२० लीगचे २-३ महिने सोडले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आर्थिक गणित सगळ्याच देशांतील क्रिकेट मंडळांना झेपत नाही, याकडेही लारा यांनी लक्ष वेधलं. (Brian Lara)
‘भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेट जगतातील मोठे देश आहेत. या देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये क्रिकेट जगवणं आणि त्यातून पैसा कमावणं हे खेळाडू आणि क्रिकेट बोर्डांसाठीही अवघड काम आहे. त्यामुळे हे देश अधिकाधिक टी-२० फ्रँचाईज क्रिकेट वळत आहेत. त्यातून त्यांना पैशाचा मार्ग दिसतो. पण, कसोटी क्रिकेटला हे मारक आहे. आणि म्हणूनच क्रिकेटमधील विषमतेवर आयसीसीनेच आता पावलं उचलायला हवीत,’ असं ब्रायन लाराला वाटतं. शिवाय कसोटी क्रिकेटला लोकांची गर्दी होईल, यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत असं मतही त्याने मांडलं आहे. (Brian Lara)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community