देशातील सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कार-2024’ (Padma Award) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एकूण 65 पुरस्कार प्रदान झाले असून, यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी संपन्न झालेल्या या भव्य सोहळ्यात, राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर तसेच अन्य वरिष्ठ केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. दुस-या टप्प्यात पार पडलेल्या या पद्मपुरस्कार समारंभात दोन पद्मविभुषण, आठ पद्मभुषण व 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पद्मविभूषण या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचा सन्मान तामिळ सुपरस्टार चिरंजीवी आणि अभिनेत्री-नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना प्रदान करण्यात आले. या दोन्ही कलाकारांनी भारतीय सिनेमा आणि कला क्षेत्रात अमिट योगदान दिले आहे. महाराष्ट्र राज्यातून सहा मान्यवरांना विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
यात होर्मुसजी एन कामा यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात, डॉ अश्विन मेहता यांना औषधी क्षेत्रात, कुंदन व्यास यांना साहित्य, शिक्षण, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर शंकरबाबा पापळकर यांना समाजसेवा क्षेत्रात, उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा व मल्लखांब प्रशिक्षण क्षेत्रात, चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना औषधी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी ‘पद्मश्री पुरस्कार’ (Padma Award) प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार प्राप्त मान्यवरांविषयी
- होर्मुसजी एन कामा (साहित्य आणि अध्यापन) – श्री होर्मुसजी एन कामा यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात अमूल्य कामगिरी केल्याबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- डॉ. अश्विन मेहता (औषधी) – डॉ. अश्विन बी मेहता हे मुंबईतील प्रख्यात आणि प्रतिष्ठित इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट असून, या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
- कुंदन व्यास – पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या कुंदन व्यास यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
- डॉ. शंकरबाबा पापळकर – अनाथ, बेवारस तसेच दिव्यांग मुलांचे आधारवड असलेले शंकरबाबा पापळकर हे अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुक्यातील आहेत. तेथील वझ्झर येथे अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहच्या माध्यमातून अशा मुलांचे संगोपन तसेच पुर्नवसनाचे त्यांचे अखंड व्रत सुरू आहे.
- डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम – न्यूरोलॉजीच्या क्षेत्रात डॉ. मेश्राम, 1987 पासून कार्यरत असून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित असे पद्मश्री (Padma Award) पुरस्काराने गौरविण्यात आले.
- उदय देशपांडे – क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावणारे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
- देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार- पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आदि विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च अथवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. वर्ष 2024 साठी, राष्ट्रपतींनी 132 पद्म पुरस्कार प्रदान करायला मान्यता दिली होती.
यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. 2 मे 2024 रोजी पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्पयात तीन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. तर दुस-या व अंतिम टप्प्यात दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
एकूण संपूर्ण सोहळ्यातील विजेत्यांमध्ये 30 महिला आहेत आणि परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय या श्रेणीतील 8 मान्यवर आणि 9 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही समावेश आहे.
Join Our WhatsApp Community