- सुजित महामुलकर
लोकसभा २०२४ निवडणुकीसाठी राज्यातील शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या १३ पैकी सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या केवळ तीन दिवस आधी करण्यात आली आणि राज्यातील ४८ जागांचे तिकीट वाटप झाले. यात राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा समावेश नाही. याचा अर्थ सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळणारा चेहेरा यापैकीच एक असू शकतो. (Lok Sabha Election 2024)
उमेदवाऱ्या जाहीर करण्यास विलंब
लोकसभा निवडणूक राज्यात पाच टप्प्यात होत असून महायुती तसेच महाविकास आघाडीतील पक्षांनी उमेदवारी घोषित करण्यासाठी जो विलंब केला तेवढा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये कधी केल्याचे ऐकिवात नाही. यापूर्वी अशी युती आणि आघाडीही झाली नाही, हा भाग आहेच. पण अनेक उमेदवारांची नावे अर्ज भरण्याची मुदत सुरू झाल्यानंतर जाहीर करण्यात आली, परिणामी त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. (Lok Sabha Election 2024)
भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिले
राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे असे भाजपाचे ‘किंग मेकर’ नेते देवेंद्र फडणवीस यांना या लोकसभेत केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा उमेदवाऱ्या घोषित होण्यापूर्वी राजकीय वर्तुळात होत होती. मात्र, सर्व उमेदवाऱ्या घोषित झाल्यावर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि नव्या शक्यतांचा जन्म झाला. आता फडणवीस राज्याच्या राजकारणात पुढील पाच वर्षे राहतील, असे म्हणण्यास वाव आहे. तसेच भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष (जे सोबत राहतील किंवा नवे जोडले जातील ते) फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जातील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिला क्रमांक फडणवीस यांचा असेल, असे म्हणण्यास हरकत नसावी. (Lok Sabha Election 2024)
मोदी यांच्याकडून संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध वाहिन्यांवर घेतल्या गेलेल्या, एका मुलाखतीत त्यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद पाच वर्षे (२०१४-२०१९) सक्षमपणे सांभाळले आणि ते राज्यात एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाची मुदत पूर्ण केली, असे सांगतानाच, मुख्यमंत्री पदावरून खाली येत उपमुख्यमंत्री म्हणून सध्या काम करीत आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली. याचा अर्थ फडणवीस यांचा राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी विचार होऊ शकतो, असे संकेत मोदी यांनी दिले. (Lok Sabha Election 2024)
अपयशाचा शिक्का पुसला
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांना घेऊन तथाकथित ‘पहाटेचा शपथविधी’ (सकाळी ८ वाजता) केला, पण तो प्रयोग फसला. त्याचे खापर फडणवीस यांच्या माथी फोडण्यात काही नेते यशस्वी झाले. त्या ‘अपयशी प्रयोगाचा शिक्का’ शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची दोन ‘शकले’ झाल्यानंतर तसेच कॉंग्रेसला काही धक्के दिले गेल्यानंतर बऱ्यापैकी पुसला गेला. आज राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना टक्कर देणारा नेता कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस, असा सूर राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. (Lok Sabha Election 2024)
शिंदे यांचे यशापयश लोकसभा निकालावर
फडणवीस यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील लोकसभेकडे पाठ फिरवून राज्याच्या राजकारणात पुढील काही काळ सक्रिय राहण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्याची तयारी केल्याने शिंदे यांनी राज्यात राहण्यास पसंती दिली असावी. सहा महिन्यानंतरही शिवसेनेची धुरा शिंदे यांच्या हाती राहिली आणि विधानसभेत घवघवीत यश मिळवल्यास ते मुख्यमंत्री पदाचे दुसरे दावेदार असतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी या लोकसभेचा निकाल पुढील दिशा ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Vidhan Parishad Election : उबाठा आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच ?)
कॉंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे
क्रिकेटप्रमाणे, राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षात घडलेल्या घटना, युत्या आणि आघाड्या पाहिल्यास पुढील सहा महिन्यात कोणता पक्ष कुठे असेल, हे या ब्रह्मांडातील कुठलेही सर्वेक्षण ठामपणे सांगू शकत नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा सातारा लोकसभा मतदारसंघासाठी विचार सुरू होता मात्र त्यांनाही लोकसभा लढविण्यापासून दूर ठेवण्यात आले. राजकीय समीकरणे बदलली आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता आल्यास, मुख्यमंत्री पदाचे काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण हे पहिले दावेदार असू शकतात. तोवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन झालेला असल्यास सुप्रिया सुळे यांनाही ती संधी दिली जाऊ शकते आणि त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरू शकतात. शेवटी निर्णय राहुल गांधी यांचा असेल. तर ‘त्रिशंकू’ परिस्थिति निर्माण झाली आणि नशिबाने साथ दिली तर अजित पवार यांच्यासह अन्य काही अनपेक्षित नावे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकतात, अशी शक्यताही नकरता येत नाही. (Lok Sabha Election 2024)
अगदी विरुद्ध विचारधारेसोबत किती काळ?
एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उबाठा गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांची या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी त्या-त्या नेत्याचे राजकीय भवितव्य ठरवेल. उद्धव ठाकरे यांनी ‘हिंदुत्व’ बाजूला सारून स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेणाऱ्या कॉंग्रेससोबत सूत जुळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत तसे अजित पवार यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील भाजपाशी मित्रत्वाच्या नात्यात राहण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष स्वतःच्या विधारधारेच्या अगदी विरुद्ध विचारधारेसोबत किती काळ टिकून राहतील, याबाबत साशंकता असली तरी ‘सत्तेसाठी काय पण’ हे अंतिम ‘सत्य’ नाकारता येत नाही. (Lok Sabha Election 2024)
यापुढे युती-आघाडीचेच सरकार
गेल्या तीन दशकात कोणत्याही एका पक्षाला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. १९९५ च्या सेना-भाजपा नंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आले. २०१९ ला ‘न भूतो’ म्हणजे भूतकाळात झाली नाही अशी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर सध्याच्या राजकीय युती आणि आघाडीचे सोप्या शब्दात वर्णन करणे कठीण आहे. हा इतिहास पाहता यापुढे युती किंवा आघाडीशिवाय सरकार स्थापन करणे कुठल्याही राजकीय पक्षासाठी एक दिव्य असेल. त्यामुळे कुणीही मुख्यमंत्री झाला तरी त्याला वाटाघाटी आणि युती धर्म पाळण्याचे कौशल्य अंगी बाळगणे अपरिहार्य असेल आणि हा काटेरी मुकुट सुरक्षित राखणे ही तारेवरची कसरत असेल, यात शंका नाही. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community