कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी, (११ मे) विजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस पडला. अवकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस झाला. कागल (Kagal)तालुक्यातील नानीबाई चिखली येथे तीन घरांचे नुकसान अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. (Rain Alert)
इचलकरंजीतील वस्त्रनगरीत अवकाळी पावसाची दमदार हजेरी लागली. सायंकाळी साडेसातनंतर विजांच्या कडकडाटात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्याची तारांबळ उडाली होती, तर खबरदारी म्हणून महावितरण कार्यालयाकडून शहराची वीज खंडित करण्यात आली होती. गेले दोन दिवस सायंकाळनंतर केवळ ढगाळ वातावरण होत होते. त्यामुळे उष्म्यामध्ये आणखी वाढ होत होती. शनिवारी सायंकाळी साडेसातनंतर जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट करीत पावसाने वस्त्रनगरीत जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास पावसाची रिपरिप सुरू होती.
(हेही वाचा – Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं; फडणवीसांचा गौप्यस्फोट)
गडहिंग्लजमध्ये पावसामुळे शेतकरी सुखावले
शहरासह परिसरात आज सायंकाळी जोरदार वळीव बरसला. शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या महिनाभरात तीन-चार वेळा वळीवाने तालुक्यात हजेरी लावली होती. विशेषत: तालुक्याच्या पूर्व व नेसरी भागात चांगला पाऊस झाला होता. मात्र, शहरासह परिसरात वळीव बरसलाच नव्हता. दोन-तीन वेळा तुरळक सरी कोसळून गेल्या होत्या. दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा उष्मा होता. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास जोरदार पाऊस कोसळत होता. शहरात अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. शहराला तळ्याचे स्वरुप आले होते. शहरालगतच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
घरांचे मोठे नुकसान
चिखली – कोडणी रोडवर असलेल्या बेनाडे वस्तीवरील तीन घरांवर काही अंतरावरील शेड उडून पडल्यामुळे तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये बेनाडे वस्तीनजीक असणाऱ्या हरीश पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या आकाराचे शेड वादळी वाऱ्यामुळे उडून राजाराम बेनाडे, विठ्ठल बेनाडे, विजय बेनाडे यांच्या घरावर येऊन पडले, यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले. तर चौगुले, मगदूम वस्तीवरील धनाजी घाटगे, यशवंत मगदूम यांच्या जनावरांसाठी उभारलेल्या शेडचेही वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे.
आजऱ्यात पावसामुळे वीजपुरवठा खंडित
आजऱ्यासह उत्तूर परिसरात विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस झाला. पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले. आज सायंकाळी पावणेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास पाऊस पडत होता. आजरा शहरात रस्ते व गटारीतून पाणी वहात होते. या पावसामुळे ऊस व काजू पिकाला फायदा होणार आहे. वादळी पावसामुळे सुमारे ५ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. आजरा सूतगिरणीजवळ ३३ केव्हीच्या उच्च दाबाच्या वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आजरा शहरासह ६० गावे अंधारात होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community