दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्गाच्या सुशोभीकरणाच्या कामांमध्ये जिन्यांवरील जुन्या पण चांगल्या लाद्या काढून नवीन लाद्या बसवण्यात येत आहेत. मात्र, जुन्या काळ्या रंगाच्या लाद्या या सुस्थितीत असतानाही सुशोभीकरणाच्या नावाखाली नवीन लाद्या बसवून भुयारी मार्गात चकचकीतपणा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु या लाद्या अत्यंत धोकादायक असल्याने महापालिका प्रशासन (Municipal Administration) चांगल्या लाद्या का उखडून काढत आहेत आणि नवीन लाद्या बसवून लोकांच्या जीवाशी का खेळत आहेत असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात असतानाच आता बांधकामात ‘स्टेप’ चुकल्याने पायऱ्यांचे काम पुन्हा तोडून नवीन बनवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. (CSMT Subway)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भुयारी मार्गाच्या नुतनीकरणासह अनेक पायऱ्या आणि भिंतींवरील टाईल्स तुटल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने घेण्याची मागणी होत होती. त्यानुसार महापालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी सुमारे कोटींहून अधिक रुपये खर्च केले जाणार आहे. महापालिकेने या कामांसाठी डी बी इन्फ्राटेक या कंपनीची निवड केली आहे. (CSMT Subway)
(हेही वाचा – Swati Maliwal : केजरीवालांच्या घरी महिला खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण)
काम निकृष्ट होण्याची भीती
भुयारी मार्गावरील या जिन्यावर नवीन पायऱ्या बसवून काही भागांमध्ये जुन्या काळ्या रंगाच्या कडप्पा वजा लाद्या काढून त्या ठिकाणी नवीन मार्बल सारख्या चकाकी असणाऱ्या लाद्या बसविण्याचे काम सुरू आहे. भुयारी मार्गातील प्रवेश क्रमांक तीन मार्गावरील पायऱ्या आणि आजूबाजूच्या भिंतीवरील लाद्या बसवल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या लोकल रेल्वे मार्गाच्या स्थानकावरून भुयारी मार्गात येणाऱ्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूच्या जिन्याच्या पायऱ्या तोडून नवीन लाद्या बसवण्याचे काम मागील दहा दिवसांपासून सुरू आहे. या भुयारी मार्गावरील जिन्याच्या सर्व पायऱ्या तोडून नवीन पायऱ्या बसवणे आदींचे काम हाती घेतले. त्यानुसार सर्व पायऱ्या तोडून त्यांचे नव्याने बांधकाम करून त्यावर मार्बल वजा लाद्या बसविण्यात आल्या. तसेच बाजूच्या भिंतीवरही याच चकाकी दर्शवणाऱ्या लाद्या लावण्यात आल्या. मात्र यापूर्वी असलेला जिना तोडून त्या ठिकाणी नवीन जिना बनवताना पायऱ्यांचे मापच चुकले. जिन्याचे बांधकाम करतांना ‘स्टेप’ चुकल्याने पायऱ्यांची संख्या कमी झाली. परिणामी जिन्याचे बांधकाम तोडून नव्याने जिन्याच्या पायऱ्या बसवण्याचे काम हाती घेतले. त्यात सर्व लाद्या पुन्हा काढण्यात आल्या आणि पुन्हा पायऱ्यांची व्यवस्थित मांडणी करून लाद्या बसवण्यात येत आहे. (CSMT Subway)
त्यामुळे जिथे चार दिवसांमध्ये हे काम होणे अपेक्षित होते. तिथे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तसेच चुकीच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना नाहकपणे त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे ज्या लाद्या लावण्यात येत आहेत. त्या लाद्यांवर मशीन फिरवून तो भाग खडबडीत करण्यात येत असला किंबहुना पायऱ्यांच्या सुरुवातीला रेषा मारून ब्रेकर बसवण्यात येत असल्या तरीही पावसाळ्यात याच लाद्यांवरून पडून दुर्घटना होण्याची भीती दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे प्रवेश क्रमांक तीन मधून खाली उतरल्यानंतर काहीही भागांमध्ये याच प्रकारच्या लाद्या बसवल्या आहेत आणि त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत ऐवजी खडबडीत करण्यात आला आहे. मात्र हा पृष्ठभाग खडबडीत केल्यानंतरही अनेक महिला तिथे पडल्याच्या घटना घडल्या आहेत, असे येथील दुकानदार सांगतात. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीच्या लाद्या सुस्थितीत आहेत. मात्र या नवीन लाद्यांची या ठिकाणी काहीही आवश्यकता नव्हती. परंतु या नवीन लाद्या बसवल्यानंतर जी भीती आमच्या मनात होती तेच आता घडत आहे. घाईघाईत गाडी पकडणारे प्रवासी, कर्मचारी हे यावरून घसरून पडली आहे. आज ही अवस्था असेल तर पावसाळ्यात काय परिस्थिती असेल याची कल्पनाच करवत नाही. घाईगडबडीत रेल्वे लोकल पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांना या लादीवर पडून जायबंदी होण्याची वेळ येईल अशी भीती येथील दुकानदार व्यक्त करतांना दिसत आहेत. (CSMT Subway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community