पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांची ट्रॅक्टर चोरीच्या घटना वाढल्या असता पुणे ग्रामीण पोलिसांनी याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 10 ट्रॅक्टर, 2 पीक अप, 1 बोलेरो, स्कॉर्पिओ, 6 मोटार सायकल आणि 5 गाय असा ऐकून 77 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हेगारांनी तीन जिल्ह्यांत 28 ठिकाणी चोऱ्या केल्याची माहिती देखील समोर आली आहे. सतीश अशोक राक्षे, विनायक नाचबोणे, प्रवीण कैलास कोरडे आणि सुनील उर्फ भाऊ बिभीषण देवकाते अशी आरोपींची नावे आहेत.
२८ ठिकाणी केल्या चोऱ्या!
ग्रामीण परिसरात सतत ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी उपकरणे चोरीला जात असल्याकारणाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या वरिष्ठांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या, त्यानुसार पोलिस निरीक्षक घनवट यांनी विशेष पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीय माहिती मिळाली की, शिरूर शहरात राहणारे सतीश अशोक राक्षे ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नावबोणे व प्रविण कैलास कोरडे हे तिघेही एकत्रित फिरतात, ते कोणताही कामधंदा करीत नसून त्यांचेकडे वेगवेगळया ट्रॅक्टर, पिकअप अशा गाड्या आणतात, त्या चोरीच्या असाव्यात, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक शाखा गुन्हे पथकाने सतीश अशोक राक्षे यास त्याचे राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याने त्याचे साथीदार ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे, प्रविण कैलास कोरडे व सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते यांनी २८ ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकूण ७६ लाख ८८ हजार किंमतीचे १० ट्रॅक्टर, २ पिकअप, १ बोलेरो जिप, १ स्कॉर्पिओ, ६ मोटार सायकल, ऑक्सिजन सिलिंडर, घरगुती गॅस सिलिंडर, गॅस कटर, ५ गायी, नट बोल्ट खोलावयाचे पाने असा मोठ्ठा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास स्थानिक गुन्हे विभाग करत आहे.
(हेही वाचा : उजनी पाणीप्रश्न पेटला! शरद पवारांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा! )
Join Our WhatsApp Community