Lok Sabha Election 2024: …तर ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष फुटलेच नसते, अमित शहांनी मुलाखतीत केलं ‘हे’ महत्त्वाचं वक्तव्य

146
Lok Sabha Election 2024: ...तर ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष फुटलेच नसते, अमित शहांनी मुलाखतीत केलं 'हे' महत्त्वाचं वक्तव्य

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सोमवारीच पार पडला आहे. या निवडणुकीत पुणे, बीड अशा महत्त्वाच्या ११ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. महाराष्ट्रासह देशभरात निवडणुकीचे ४ टप्पे पार पडले आहेत. पाचवा टप्पा २० मे रोजी होणार आहे. महाराष्ट्रातला हा शेवटचा टप्पा असेल. या पार्श्वभूमीवर प्रचार जोरात सुरू आहे. तसंच मुलाखतींचं सत्रही सुरू आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. (Amit Shah) (Lok Sabha Election 2024)

मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, ”मी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा देशाच्या चारही दिशांच्या राज्यांमध्ये फिरलो. सगळ्या देशाने हे ठरवलं आहे की, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा संधी द्यायची. पूर्व आणि दक्षिण भागात भाजपा खूप चांगली कामगिरी करेल यावर माझा विश्वास आहे. बंगालमध्ये आमच्या जागा वाढतील. ओदिशा, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतही आमची कामगिरी चांगली असेल. तसंच केरळमध्येही आम्ही आमचं खातं उघडू हा मला विश्वास आहे. ४०० पार जागा जातील आणि नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील याची मला खात्री आहे.” (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Google Pixel 8a : गुगलचा ‘हा’ बजेट फोन भारतात लाँच, काय आहेत फिचर्स?)

”महाराष्ट्रात मागच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकल्या असत्या. आत्ताही एक-दोन जागा इकडे तिकडे जाऊ शकतात. तेवढा अपवाद सोडला तर आम्ही बहुतांश जागा जिंकू. ज्या एक-दोन जागांबद्दल बोलतो आहे तिथेही काँटे की टक्कर होईल.” असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

‘या’ लोकांना देशाच्या संस्कारांची माहितीच नाही
देशात मोदींची लाट २०१४ मध्ये २०१९ मध्ये होती त्या तुलनेत आत्ताची लाट मोठी आहे. फक्त आम्हाला विरोधक त्या लाटेशी लढण्यासाठी काही खास कष्ट घेताना दिसत नाहीत. जेव्हा संघर्ष होतो तेव्हा ही लाट अधोरेखित होते. आत्ताची स्थिती अशी आहे की इंडि आघाडीला अजून त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा किंवा नेताच मिळालेला नाही. राहुल गांधी म्हणतात, मुस्लिम पर्सनल लॉ आणणार, उद्धव ठाकरे त्यांच्याशी सहमत नाहीत. नाना पटोले म्हणतात, आम्ही राम मंदिराचं शुद्धीकरण करणार. ज्या मंदिरात राम आहे त्या मंदिराचं कसं शुद्धीकरण करणार? या लोकांना देशाच्या संस्कारांची माहितीच नाही, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांनी सोडून दिले
उद्धव ठाकरेंना आम्ही बरोबर घेतलं होतं. २०१९ मध्ये त्यांनी माझ्यासमोर मान्य केलं होतं की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असतील. मी, नरेंद्र मोदींनी जेव्हा उद्धव ठाकरेंसह संयुक्त सभा घेतल्या तेव्हाही आम्ही आमच्या भाषणांमधून हेच सांगत होतो की, महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. त्यांच्या समोर आम्ही अनेकदा सांगितलं होतं. आता निवडणूक निकाल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री होण्याचा मोह निर्माण झाला; पण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांनी सोडून दिले आहेत. त्यांना दीर्घकाळ याचा फटका बसणार आहे, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

…तर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटले नसते
शरद पवारांनी मुलीच्याऐवजी म्हणजेच सुप्रिया सुळेंच्याऐवजी जर अजित पवारांकडे त्यांचा वारसा आणि पक्ष सोपवला असता तर तो पक्ष फुटला असता का? उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना संधी दिली असती. तर शिवसेना फुटली असती का? शरद पवारांच्या कन्याप्रेमामुळे आणि उद्धव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे हे दोन पक्ष फुटले आहेत. आता ते आम्ही पक्ष फोडले आहेत असा आरोप करत आहेत. असंही अमित शाह म्हणाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.