घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला लोहमार्ग पोलीसही तेवढेच जबाबदार असून मुंबई पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. लोहमार्ग पोलिस परवानगी देऊन भाडे घेत असल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे असे गलगली यांनी म्हटले आहे. (Ghatkopar Hoarding Accident)
घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत १४ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. ६५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. पंतनगर पोलिसांनी इगो मीडिया या जाहिरात कंपनीचे संचालक भावेश भिंडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या मते राज्य लोहमार्ग कल्याण निधीच्या जागेत ४ महाकाय होर्डिंग आणि एक पेट्रोल पंप सुरु करण्यात आले आहे. यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त लोहमार्ग यांनी परवानगी दिली, परंतु मुंबई महानगरपालिका प्रशासनाची परवानगी घेतली गेलेली नव्हती, उलट पालिकेने मागील वर्षी या होर्डिंग प्रकरणात कारवाई करण्यासाठी लेखी पत्र पाठविले. मुंबईत ४० बाय ४० ची होर्डिंग परवानगी पालिका देते परंतु लोहमार्ग पोलीस कल्याण निधीच्या जागेत उभारण्यात आलेल्या दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचा आकार १२० बाय १२० असा होता. (Ghatkopar Hoarding Accident)
(हेही वाचा – Harvard University मधील संशोधकांनी सांगितली अकाली मृत्यूची ‘ही’ कारणे)
७ डिसेंबर २०२१ रोजी लोहमार्ग पोलिसांनी इगो मीडिया कंपनीस होर्डिंग उभारण्यासाठी परवानगीचे कंत्राट दिले होते. जाहिरात कंपनीने नियमाच्या बाहेर जाऊन हे होर्डिंग उभारले होते, लोहमार्ग पोलिसांनी या बेकायदेशीर उभारलेल्या होर्डिंगबाबत शहानिशा केलेली नव्हती असे समोर आले असल्याचे गलगली यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितले. या होर्डिंगचे भाडे हे लोहमार्ग पोलीस कल्याण निधीत जात होते, त्यामुळे या दुर्घटनेत लोहमार्ग पोलीस तेवढेच जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. मुंबईत रेल्वे, एमएमआरडीए, बीपीटी, म्हाडा, एमएसआरडीसी यांनी होर्डिंग लावताना पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असून सद्यस्थितीत सर्व होर्डिंगचे सुरक्षा ऑडिट केले जावे, अशी गलगली यांची मागणी आहे.(Ghatkopar Hoarding Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community