विदेशी मद्यांच्या ६२५ खोक्यांसह ट्रक जप्त!

सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे ५६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५०० खोकी जप्त केली होती.

331

६७ लाख रूपये किंमतीचेगोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बडगा

देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध  राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची गोवा राज्यातील अवैध मद्य विरुद्ध या महिन्यातील तिसरी मोठी कारवाई आहे.
सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६३५ खोके असलेला ट्रक पकडला. ब्लेंडर्स प्राईड, रॉयल चॅलेंजर्स, अरोबेला व्होडका, इम्पिरियल ब्लू व्हिस्की या ब्रॅंडच्या ७५० मि.ली. वजनाच्या बाटल्यांचे ५२५ खोके, तर बडवायझर बियरचे अर्धा लीटर वजनाच्या टीनचे १०० खोके असे एकूण ६२५ खोके ट्रकसह भरारी पथकाने जप्त केले आहेत.

(हेही वाचा : पदोन्नती आरक्षणावरून काँग्रेसमध्येच राजकारण! मराठा नेत्यांचे माैन!)

सहा दिवसांपूर्वीही केलेली कारवाई!

ट्रकसह या मद्याची एकूण किंमत ६७ लाख ५७ हजार ७४० रुपये असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे. गेल्या सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे ५६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५०० खोके तर २० मे रोजी उस्मानाबाद येथेही ४३ लाख ९३ ह्जार रुपये किमतीचे अवैध मद्याचे ५७५ खोक्यांसह मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.