राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा गाजणार?

लॉकडाऊनबाबत मंत्र्याची वेगवेगळी वक्तव्ये येत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनवरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. 

164

राज्य मंत्रिमंडळाची आज, गुरुवारी, २७ मे रोजी दुपारी साडे तीन वाजता बैठक होत असून, आजच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याचे कारण म्हणजे तौक्ते चक्रीवादळ, मराठा आरक्षण, लॉकडाऊन तसेच सध्या राज्यात गाजत असलेल्या पदोन्नती आरक्षणाच्या मुद्दावर देखील पुन्हा एकदा जोरदार चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, राज्य सरकारने अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल देखील सरकारकडे येणार आहे. या अहवालावरून राज्य सरकार पुढची दिशा ठरवणार आहे. तसेच म्युकरमायकोसिसच्या आजारावर देखील चर्चा होणार आहे.

तौक्ते चक्रीवादळावर देखील चर्चा

तोक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह मुंबईत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते वादळात नुकसान झालेल्यांना निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी कशा स्वरुपाची मदत असेल, किती मदत असेल यावर देखील सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्या! संभाजी राजेंचे शरद पवारांना आवाहन )

लॉकडाऊनचे काय होणार?

लॉकडाऊनबाबत मंत्र्याची वेगवेगळी वक्तव्य येत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथील होणार की आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवणार की तो शिथील करायचा असेल तर कशा प्रकारे आणि किती टप्प्यात करणार, यावर देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.

पवारांनी मुख्यमंत्र्यांना काय सल्ला दिला?

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीच आलबेल नाही. पदोन्नती आरक्षणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आता खूपच संबंध ताणले आहेत. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनीही तलवार उपसली आहे. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता असल्याने त्याआधीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पवारांनी या विषयावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना काही सल्ला दिला का? तसेच मुख्यमंत्री आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.