- सुजित महामुलकर
गेली अनेक वर्षे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सेनेत फूट पडल्यानंतर ठाण्याचे सुपुत्र आणि शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांचे मानसपुत्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या फूटीनंतर ठाण्याची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असून शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे यांची उबाठा आमने-सामने असून या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Thane LS Constituency)
शिंदेंचे ठाण्यावर ‘लक्ष्य’
ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे (शिंदे) नरेश म्हस्के तर शिवसेना उबाठाकडून राजन विचारे मैदानात आहेत. म्हस्के हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे असून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिंदे यांनी ठाण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. आज १५ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शेजारच्या कल्याण मतदार संघात झाली. तर शुक्रवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिंदे यांचा ठाण्यात रोड शो होणार आहे. (Thane LS Constituency)
(हेही वाचा – ऐन निवडणुकीच्या प्रचारात दक्षिण मध्य मुंबईत UBT आणि Congress आमनेसामने)
विचारे यांचा लोकसभेचा मार्ग जवळपास बंद
ठाणे लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र असून सर्व ठिकाणी महायुतीचे आमदार कार्यरत आहेत. यातील एका कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व खुद्द मुख्यमंत्री शिंदे करत आहेत तर अन्य पाचपैकी तीन ठिकाणी म्हणजे ठाणे-संजय केळकर, ऐरोली-गणेश नाईक, बेलापूर-मंदा म्हात्रे आणि मीरा-भाईंदर मध्ये भाजपासमर्थक गीता जैन तर एका ठिकाणी शिवसेनेचे (शिंदे) प्रताप सरनाईक आमदार म्हणून प्रभावीपणे काम करत आहेत. त्यामुळे गेल्या दोन २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभेत ठाण्याचे भाजपा-सेना युतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेना उबाठाच्या राजन विचारे यांना लोकसभेचा मार्ग जवळपास बंद झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Thane LS Constituency)
भाजपाचा विरोध मावळला
नरेश म्हस्के यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असून कोणताही आरोप नसलेले आणि स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार अशी असल्याने त्यांच्याबाबत जनमानसात सकारात्मक वातावरण आहे. म्हस्के यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर नवी मुंबईतील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता, मात्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर आणि म्हस्के यांनीही गणेश नाईक यांची भेट घेतली आणि त्यानंतर हा विरोध मावळला, असे दिसते. (Thane LS Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community