सन २०१४ ची लोकसभा निवडणूक ही ‘फेसबुक इलेक्शन’ म्हणून, तर २०१९ ची ‘व्हॉट्सअॅप इलेक्शन’ म्हणून ओळखली गेली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी समाजमाध्यमांची भूमिका मोठी असली, तरी ही निवडणूक मात्र ‘यूट्यूब इलेक्शन’ ठरली असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. (Lok Sabha Election 2024)
निवडणुकांच्या प्रचारामध्ये सभा, संमेलने, मेळावे, मिरवणुका याचबरोबर पत्रके, फलक आदी पारंपरिक मार्ग आणि साधनांचा वापर केला जात असला, तरी मोबाईल आणि इंटरनेट क्रांतीने निवडणूक प्रचाराचा चेहरामोहरा बदलला आहे. एवढेच नव्हे, तर ही आधुनिक साधने अत्यंत प्रभावशाली ठरत आहेत. त्यामुळेच त्या निवडणुकांना फेसबुक वा व्हॉट्सअॅप निवडणूक म्हटले गेले आहे. मध्यंतरीच्या काळात स्वस्तातील स्मार्टफोन, जगातील सातव्या क्रमांकाचा स्वस्त मोबाईल डेटा यामुळे समाजाचे मोठ्या प्रमाणावर ‘टिकटॉकीकरण’ झाले. अनेकांना ‘व्हिडीओ रिल्स’चे अक्षरशः व्यसन लागले. यातूनच यूट्यूब व्हिडीओंची लाट निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election 2024)
आज भारतात यूट्यूब या मंचाचे सुमारे ४६ कोटी ७० लाख वापरकर्ते असून, ‘फिक्की-ईवाय’ च्या भारतीय माध्यम आणि मनोरंजन विश्वासंबंधीच्या २०२४ च्या अहवालानुसार बिहार, झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये यूट्यूबने टीव्हीलाही मागे टाकले आहे, तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीत ही दोन्ही माध्यमे एकाच पातळीवर आलेली आहेत. यूट्यूबचा हा प्रसार आणि व्हिडीओ संदेशात असलेली ताकद लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आपल्या यूट्यूब वाहिन्या सुरू केल्या आहेत. आपल्या सभा, मुलाखती, कार्यक्रमांचे लाइव्ह स्ट्रिमिंग (थेट प्रक्षेपण), छोटे छोटे संदेश, प्रचार गीते आदी त्या वाहिन्यांवरून मतदारांपर्यंत पोहचवले जात आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – नाशकात ठाकरे गट-शिंदे गट आमनेसामने; CM Eknath Shinde यांच्या रोड शो वेळी दोन्ही गटाकडून घोषणाबाजी)
यूट्यूबवरून प्राप्त आकडेवारीनुसार देशातील कोणत्याही राजकीय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बाबतीतही आघाडीवर आहेत. यूट्यूबचे महत्त्व ओळखून त्यांच्या प्रचारक कंपनीने तब्बल १७ वर्षांपूर्वी, २६ ऑक्टोबर २००७ रोजी मोदी यांचे यूट्यूब चॅनेल सुरू केला होते. आज २ कोटी ३३ हजार लोक त्याचे सबस्क्रायबर असून, त्यावर २६ हजार व्हिडीओ आहेत. १७ वर्षांत या सर्व व्हिडीओंना ५ अब्ज २८ कोटी ४ लाख २३२ व्ह्यूज मिळाले. (Lok Sabha Election 2024)
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा यूट्यूब चॅनेल मोदींनंतर तब्बल १० वर्षांनी, १० ऑगस्ट २०१७ रोजी सुरू झाला. आज त्याचे ५ लाख ४१ हजार सबस्क्रायबर आहेत. मात्र व्हिडीओंची संख्या आणि व्ह्यूज या प्रमाणात त्यांनी बरीच मजल मारल्याचे दिसून येते. त्यांच्या चॅनेलवर केवळ २ हजार ३६० व्हिडीओ असून, व्ह्यूज १ अब्ज १३ कोटी ३६ लाख ६९ हजार ८४३ एवढे आहेत. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने ईडीला खडसावले; …तर आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही)
या तुलनेत महाराष्ट्रातील नेते मात्र खूपच मागे असल्याचे दिसते. त्यातही यूट्यूब चॅनेल सुरू करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी घेतली आहे. ७ जुलै २०१२ रोजी त्यांनी त्यांचे चॅनेल सुरू केले. आजमितीला ५ लाख ६२ हजार सबस्क्रायबर असून, त्यावर १२ हजार १६५ व्हिडीओ आहेत. त्यांच्या व्ह्यूजची संख्या आहे तब्बल १९ कोटी १६ लाख ५९ हजार ४४. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी ११ जुलै २०१६ रोजी, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांचे चॅनेल सुरू केले. शरद पवार यांना केवळ ३६ हजार सबस्क्रायबर असून, त्यावर ३६६ व्हिडीओ आहेत. त्यांना आतापर्यंत ४५ लाख ५९ हजार ५३६ व्ह्यूज आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सबस्क्रायबरची संख्या ५१ हजार ९००, व्हिडीओंची संख्या १ हजार ९२६, तर त्यांना व्ह्यूज आहेत २ कोटी २९ लाख ६ हजार ६२०. शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मात्र अद्याप स्वतंत्र यूट्यूब चॅनेल नाही. अशा चॅनेलमुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांना टाळूनही हे नेते आपले म्हणणे लोकांसमोर नेत आहेत. शिवाय छोट्या क्लिप्सद्वारे प्रभावीपणे मतदारांसमोर जात आहेत. (Lok Sabha Election 2024)
पक्षीय यूट्यूब बळ
राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक ६ लाख ४० हजार सबस्क्रायबर आम आदमी पक्षाच्या यूट्यूब चॅनेलला असून, त्यानंतर भाजपा (५ लाख ९२ हजार), तर काँग्रेस (४ लाख ६२ हजार) असा क्रम आहे. राज्याच्या पातळीवर शिवसेना (ठाकरे) या पक्षाने यात आघाडी घेतलेली आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनेलचे सबस्क्रायबर तब्बल ३ लाख ५२ हजार एवढे असून, त्या खालोखाल भाजपा महाराष्ट्र ५८ हजार ७००, काँग्रेस महाराष्ट्रचे ९ हजार ७१०, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केवळ ४ हजार एवढे सबस्क्रायबर आहेत. (बातमीतील सर्व आकडेवारी १४ मे २०२४ पर्यंतची) (Lok Sabha Election 2024)
आप – ६.४ एम – ६ लाख ४० हजार
भाजपा – ५.९२ एम – ५ लाख ९२ हजार
काँग्रेस – ४.८२ एम – ४ लाख ६२ हजार
शिवसेना ठाकरे – ३५२ के – ३ लाख ५२ हजार
राष्ट्रवादी पवार – ४ के – ४ हजार
भाजपा महाराष्ट्र – ५८.७ के – ५८ हजार ७००
काँग्रेस महाराष्ट्र – ९.७१ के – ९ हजार ७१० (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community