North Mumbai LS Constituency : काँग्रेससाठी यंदाही नसेल भूषणावह विजय

161
North Mumbai LS Constituency : काँग्रेससाठी यंदाही नसेल भूषणावह विजय
  • सचिन धानजी,मुंबई

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून यंदा भाजपाचे पीयूष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्या लढत आहे. हा मतदार संघ उबाठा शिवसेनेला आपल्या गळाला लावायचा होता, परंतु शेवटच्या क्षणाला काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे उबाठाचे स्वप्न भंग पावले आहे. परंतु भूषण पाटील यांच्या रुपात तेवढ्या ताकदीचा उमेदवार पीयूष गोयल यांच्यासमोर नसल्याने काँग्रेसला यंदाही या मतदार संघात भूषणावह वाटेल असा विजय मिळवण्याची शक्यता फारच कमी आहे. (North Mumbai LS Constituency)

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात यंदा भाजपाने गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापून त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे, तर ही जागा काँग्रेससाठी सोडली जाणार हे माहित असूनही शिवसेना उबाठा पक्षाने पक्षाचे उपनेते विनोद घोसाळकर आणि त्यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर यांना लोकसभेच्या दृष्टीकोनातून बांधणी करायला भाग पाडले होते. परंतु शेवटच्या क्षणाला भूषण पाटील यांना उमेदवारी दिल्याने घोसाळकर कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यामुळे एकप्रकारे काँग्रेसला जर हा मतदार संघ सोडला जाणार होता तर घोसाळकर कुटुंबाला लोकसभेची तयारी करायला का लावली असा सवाल खासगीमध्ये शिवसेनेकडून केला जात आहे. (North Mumbai LS Constituency)

त्यातच पीयूष गोयल यांची या मतदार संघातील बाजू अधिक मजबूत आहे. या मतदार संघात दहिसर, बोरीवली, कांदिवली पूर्व आणि चारकोप या चार विधानसभा मतदार संघात भाजपाचे आमदार आहेत, तर मागाठाणेमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत, तर एकमेव मालाडमध्येच अस्लम शेख हे काँग्रेसचे आमदार आहे. त्यामुळे पीयूष गोयल यांची बाजू मजबूत मानली जात आहे. सन २०१४मध्ये भाजपाचे गोपाळ शेट्टी यांना ६,६४,००४ एवढी मते मिळाली होती, तर सन २०१९मधील निवडणुकीत शेट्टी यांना ७,०६,६७८ एवढी मते मिळाली होती. मुंबईतील सर्वांत मताधिक्य घेऊन या मतदार संघातून गोपाळ शेट्टी हे विजयी झाले होते. मागील निवडणुकीत काँग्रेसकडून २०१४मध्ये संजय निरुपम, सन २०१९मध्ये उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु आता त्यापेक्षाही कमजोर उमेदवार यावेळी देण्यात आला आहे. (North Mumbai LS Constituency)

(हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने ईडीला खडसावले; …तर आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही)

भूषण पाटील हे बोरीवलीतील मतदार असले तरी काँग्रेस पक्षात त्याचे काम प्रशासकीय स्तरावरील असल्याने कार्यकर्त्यांशी त्यांचा तेवढा संबंध नाही. मात्र, यंदा काँग्रेससोबत उबाठा शिवसेना पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या मतांमध्ये मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत किती वाढ होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, दुसरीकडे भाजपाला मनसेची साथ लाभली आहे. या मतदार संघातील दहिसर, मागाठाणे, कांदिवली या भागांमध्ये मनसेचे मूळ मतदार हे सुमारे ६० हजारांच्या आसपास आहेत, तर त्याखालोखाल मालाडमध्ये सुमारे दहा हजारांहून अधिक आणि चारकोप भागांमध्ये मनसेचे काही प्रमाणात मतदारदार असल्याने याचा फायदा भाजपाला होणार आहे. शिवाय या भागांत पूर्वी शिवसेनेची सर्व मते भाजपाला मिळाली असली तरी यंदा उबाठा शिवसेची काही मते कमी होणार आहे. त्यामुळे पीयूष गोयल यांच्या मतांचा टक्का किती घसरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. गोयल यांचा पराभव करणे अशक्य असले तरी त्यांचे मताधिक्य कमी करणे हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य असेल असे बोलले जात आहे. (North Mumbai LS Constituency)

मागील दहा वर्षांमध्ये गोपाळ शेट्टी यांनी विविध मुद्द्यांकडे तसेच समस्यांकडे लक्ष वेधून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच त्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच सन २०१४च्या तुलनेत २०१९च्या निवडणुकीत त्यांच्या मतांचा टक्का वाढल्याचे दिसून आला आहे. विशेष भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल यांनी मनोरी येथील मच्छिमार बांधवांना आरोग्य सुविधा आणि रुग्णालय तातडीने तयार करण्याचे आश्वासन दिले. तसेच विविध मच्छिमार संस्थांसाठी शीतपेट्या आणि मासेमारीसाठी मत्स्य प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचे आश्वासन दिले. मनोरीतील घरांना पक्के स्वरूप देण्याचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देतानाच या परिसरात क्रीडांगण सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगितले. तसेच पाणीपुरवठा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. (North Mumbai LS Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : यूट्यूब व्हिडिओंवर भर, प्रचार झालाय आधुनिक)

या भागांमधील समस्या
  • मालाड मनोरी कोळीवाडा आणि अंतर्गत रस्त्यांचा विकास.
  • गोराई गावातील पाणी प्रश्न, गावातील लोकांना आरोग्य सुविधा.
  • कांदिवली भागातील म्हाडाच्या माध्यमातून अनेक भागांचा विकास.
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी लोकांच्या तसेच त्या भागातील लोकांच्या पुनर्वसन समस्या.
  • दहिसर चेक नाका, बोरीवली रेल्वे स्टेशन ते बाभई नाका, शिपोंली, मालाड आदी भागांमधील वाहतूक कोंडी.
  • दहिसर, बोरीवली, मालाड आदी भागांमधील कोळीवाड्यांचे सिमांकन आणि कोळी बांधवांना सुविधा. (North Mumbai LS Constituency)
आतापर्यंत बनलेले खासदार

सन २०१९ : गोपाळ शेट्टी, भाजपा ७,०६, ६७८

सन २०१४ : गोपाळ शेट्टी, भाजपा ६, ६४,००४

सन २००९ : संजय निरुपम, काँग्रेस २, ५५, १५७

सन २००४ : गोविंदा अहुजा, काँग्रेस ५, ५९, ७६३ (North Mumbai LS Constituency)

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ

बोरीवली : सुनील राणे, भाजपा

दहिसर : मनिषा चौधरी, भाजपा

मागाठाणे : प्रकाश सुर्वे, शिवसेना

कांदिवली पूर्व : अतुल भातखळकर, भाजपा

चारकोप : योगेश सागर, भाजपा

मालाड पश्चिम : अस्लम शेख, काँग्रेस

  • सनद २०२४मधील मतदार : १७ लाख ७४ हजार ४९०
  • सन २०१९मधील मतदार : १६ लाख ४७ हजार २०८ (North Mumbai LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.