Shrikant Shinde यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाच वर्षांचे मांडले व्हिजन ; कोस्टल रोड, फ्री वे, मेट्रो आणि बरेच काही…

उल्हासनगरातील २०० बेड्सचे नो कॅश काउंटर हॉस्पिटल प्रत्येक शहरात सुरु करणे, स्पोर्ट्स स्टेडियम, महिलांसाठी, दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र भवन उभारण्याचा मानस डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

244
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्या ठिकाणी प्रचाराला जोर आला आहे. त्यासाठी उमेदवार श्रीकांत शिंदे यांनीही आता रणनीती ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कल्याण मतदार संघात पुढील पाच वर्षांत कोणती कामे केली जाणार आहे, याची माहिती दिली. या मतदारसंघातील रेल्वे स्टेशनलगत ट्रॉमा सेंटर, रेतीबंदर ते कल्याणपर्यंत कोस्टल रोड, ऍक्सेस कंट्रोल फ्रिवे, इंटर्नल मेट्रोने शहरे जोडणे आणि पाणी पुरवण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे वचन डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी संकल्प पत्रात दिले आहे.
सलग 10 वर्षे खासदार असलेले महायुतीचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढील पाच वर्षाचे व्हीजन पत्रकार परिषदेत सादर केले. २०१९च्या जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वासने पूर्ण केली. कल्याण यार्ड रिमॉडलिंगचा ८०० कोटींचा प्रकल्प होत आहे. यामुळे मेल एक्सप्रेस, लोकल सेवा यांना क्रॉसिंग बंद होऊन स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होईल. खारेगाव, दिवा, ठाकुर्ली आणि कल्याण पश्चिम येथील रेल्वे फाटक बंद झाले आहेत. त्यामुळे पुढील एक वर्षात पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित होऊन कल्याण ते कुर्लापर्यंत शटल सेवा सुरु करणे शक्य होईल, असे डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सांगितले.

कल्याण-पनवेल लोकल 

कल्याण-कर्जत, कल्याण-कसारा शटल सेवा, दिवा वसई मार्गावर लोकल सेवा, कल्याण ते पनवेल लोकल सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. भविष्यातील तिसरी मुंबई कल्याण परिसरात होणार असून पुढील पाच वर्षात येथे पायाभूत सुविधांचा नियोजनबद्धपध्दतीने विकास केला जाईल, अशी ग्वाही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याणमध्ये मेट्रो १२ चे काम सुरु झाले आहे. त्याचबरोबर बदलापूरपर्यंत मेट्रो १४ ला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच सुरु होईल, असे ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. विठ्ठलवाडी ते शहाड हा ब्रीज करण्यात येणार आहे. कल्याणमध्ये यूटाईप रोड, इतर शहरात पार्किंग प्लाझा सुरु केले जातील, असे आश्वासन डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिले आहे.

एम्सच्या धर्तीवर रुग्णालय 

उल्हासनगरातील २०० बेड्सचे नो कॅश काउंटर हॉस्पिटल प्रत्येक शहरात सुरु करणे, स्पोर्ट्स स्टेडियम, महिलांसाठी, दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र भवन उभारण्याचा मानस डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच सुरु होणार आहेत. कल्याणमध्ये एम्सच्या धर्तीवर हॉस्पिटलची मागणी करण्यात आली, अंबरनाथमधील यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र इतर शहरादेखील सुरु करण्यात येतील. मतदार संघातील सर्व शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. अंबरनाथमध्ये आयटीआयचे आधुनिकीकरण करणे, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी अंतरलीमध्ये महा हब मंजूर करण्यात आले असून ते लवकरच सुरु करण्यात येईल, असे डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी यावेळी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.