राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येवून जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ लोटला, मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांची अंतर्गत कुरघोडी काही थांबताना दिसत नाही. मात्र नेत्यांच्या या अंतर्गत कलहाचा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंटाळा आला असून, तशी नाराजी त्यांनी महाविकास आघाडीचे निर्माते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बोलून दाखवल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी बोलून दाखवल्याचे कळत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्री हे आवाज चढवून बोलत असल्याने मुख्यमंत्री नाराज आहेत. तसेच काही मंत्री हे एखादा निर्णय परस्पर जाहीर करत असल्याने देखील मुख्यमंत्री नाराज आहेत. त्याचमुळे काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या सर्व विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा केली.
सरकार टिकवणे ही सेनेची जबाबदारी नाही असे वक्तव्य केल्याचे वृत्त ही अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. शरद पवार रुग्णालयात होते बरेच दिवस भेटले नाही, त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेटले. मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना तौक्ते या विषयावर चर्चा झाली. हे सरकार पाच वर्ष टिकेल.
– संजय राऊत, शिवसेना नेते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मुख्यमंत्र्यांची वाढली डोकेदुखी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असून, मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. एकीकडे मराठा समाज आक्रमक आहे आणि दुसरीकडे ठाकरे सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या विषयावर आपापसात भिडले आहेत. त्याचमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी अधिक वाढली आहे. सरकार चालवणे ही फक्त माझी जबाबदारी नसून, सर्वांचीच आहे, असे मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांनी सांगितल्याचे कळते.
कुठल्याही मंत्र्यांनी कार्यपद्धतीवर कुठलेही प्रश्न निर्माण केलेले नाही. सरकार एकजुटीने काम करत आहे. शरद पवार व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसह लसीकरण, लॉकडाऊन व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. शिवाय पक्षाचे नेते शरद पवार यांना भेटल्यावर राजकीय परिस्थितीवर मंत्र्यासोबत चर्चा करत असतात.
– नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
(हेही वाचा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा गाजणार?)
समज देऊनही फरक पडेना!
ठाकरे सरकारमधील वाचाळवीर मंत्र्यांना अनेकदा समज दिली, तरीही काही फरक पडताना दिसत नसून, याआधीही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे होणाऱ्या वादांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांनी तोंडावर ताबा ठेवावा, अशा कडक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेते आणि मंत्र्यांना फटकारले होते. विनाकारण सार्वजनिक वादग्रस्त विधाने टाळा. ज्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाहीत, अशी वक्तव्ये करू नका, अशा कडक सूचना पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. मात्र तरी देखील मंत्र्यावर काही फरक पडत नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे.
Join Our WhatsApp Community