Tree Cutting : महापालिका निघाली डोंगरावरील झाडे कापायला, आणि…

मुंबईतील डोंगर उतरावरील धोकेदायक झाडांची छाटणी महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. त्यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षण अंती जवळपास ४० ठिकाणे निश्चित केली असून, या ठिकाणांवरील ४१४ झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे.

697
Tree Cutting : दुर्घटना घडताच मुंबईत झाडांची कापाकापी जोरात

मुंबईतील खासगी इमारतींसह रस्त्यालगतच्या तसेच गजबजलेल्या भागातील खासगी मालमत्तांच्या जागेवरील मृत झाडे तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याकडे दुर्लक्ष करणारी महापालिका आता डोंगराला हात घालायला चालली आहे. मुंबईतील डोंगर उतरावरील धोकेदायक झाडांची छाटणी महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. त्यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षण अंती जवळपास ४० ठिकाणे निश्चित केली असून, या ठिकाणांवरील ४१४ झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे. यापैकी ३०५ झाडांची छाटणी करण्यात आली आहे. उर्वरित झाडांची छाटणीदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. (Tree Cutting)

मुंबईतील नाल्यांतून गाळ उपशासह मुंबईतील धोकेदायक झाडांची तसेच मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गालगतच्या झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीही करण्यात येत आहे. डोंगर उतारावरील झाडांची सुयोग्य छाटणी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाकडून डोंगर उतारावर, टेकड्यांवर धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांची छाटणी कामांना वेग देण्यात आला आहे. (Tree Cutting)

(हेही वाचा – PM Narendra Modi : ४ जूननंतर इंडि आघाडी फूटणार; पंतप्रधानांचा हल्लाबोल)

उद्यान विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार महानगरपालिका क्षेत्रासह वन विभागाच्या हद्दीतील ४० ठिकाणी मिळून ४१४ धोकादायक झाडे आहेत. उद्यान विभागाच्या पथकांनी या झाडांची छाटणी सुरू केली आहे. मागील १३ मे २०२४ पर्यंत ४१४ झाडांपैकी ३०५ झाडांची छाटणी करण्यात आली आहे. उर्वरित झाडांची छाटणीही ७ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मुंबई महानगरात खासगी तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात आतापर्यंत ८ हजार ५५७ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. (Tree Cutting)

विशेष म्हणजे खासगी गृहनिर्माण संस्थांसह खासगी मालमत्तांच्या जागांवरील रस्त्यालगतच्या तसेच सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीसाठी शुल्क आकारले जाते. त्यामुळे शुल्क आकारल्याशिवाय झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यास प्रशासनाकडून नकार दिला जातो आणि दुसरीकडे डोंगरावरील झाडे कापण्यास महापालिका निघाली आहे, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Tree Cutting)

झाडांच्या छाटणीसाठी प्रशासनाशी संपर्क साधा

मुंबईतील रस्त्याच्याकडेची तसेच सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची छाटणी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जाते. गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. (Tree Cutting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.