Lok Sabha Election : दक्षिण मध्य मुंबईत जो लावेल जास्त जोर, त्याचाच होईल शोर

242
  • सचिन धानजी, मुंबई

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) विद्यमान खासदार शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आणि शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यात प्रमुख लढत असून शेवाळे हे विजयाची हॅट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. तर त्यांची हॅट्रीक रोखण्याच्या तयारीला शिवसेना उबाठासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागले आहेत. सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची समसमान ताकद असल्याचे दिसून येत असले तरी मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत शेवाळेंना हा पेपर सोपा नाहीच, परंतु कठिणही नाही. त्यामुळे शेवाळे आणि देसाईंमध्ये काटें की टक्कर होणार असून भाजपाची जेवढी ताकद वाढेल तेवढा शेवाळेंचा विजय सुकर होईल असे बोलले जात आहे. मात्र, देसाई हे प्रथमच जनतेतून निवडणूक लढवत असल्याने त्यांच्यासाठी हारजीतचा परिणाम नसला तरी त्यांचा विजय हा महायुतीला ऑक्सिजन देणारा ठरेल, असे दिसून येत आहे.

या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) शिवसेनेचे राहुल शेवाळे, उबाठा शिवसेनेचे अनिल देसाई, वंचित बहुजन आघाडीचे अबुल हसनअली हसन खान यांच्यासह १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात (Lok Sabha Election) दादर, वडाळा, शीव कोळीवाडा या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपचे आमदार आहेत. तर चेंबूर, धारावी आणि अणुशक्ती नगर या तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहे. मागील दोन निवडणुकीत अखंड शिवसेनेचे उमेदवार म्हणून शेवाळेंनी निवडणूक लढवली असली तरी यंदा त्यांच्यासमोर उबाठा शिवसेनेचे आव्हान आहे. उबाठा शिवसेनेचे अनिल देसाई हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने निवडणूक रिंगणात उतरल्याने शेवाळेंसमोरील चिंता वाढली आहे.

…तर शेवाळेंना 4 लाखांहून अधिक मते मिळतील 

मागील दोन निवडणुकीत शेवाळे हे युतीचेच उमेदवार होते. त्यामुळे भाजपाची पूर्ण ताकद त्यांच्या पाठिमागे आहे, पण ती ताकद देसाईंच्या मागे नाही. देसाई यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने या मतदारसंघातील यापूर्वीचे महाविकास आघाडीचे एकनाथ गायकवाड यांना सरासरी अडीच लाख मतदान झालेले आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेचे मतदान गृहीत धरल्यास देसाईं यांना साडेतीन त पावणे चार लाख मतदान होणे अपेक्षित आहे.

परंतु उबाठा शिवसेनेची पोकळी मनसेला भरुन काढायची आहे. शिवसेनेचे मतदान आपल्याकडे फिरवून शेवाळेंना जर मनसेचे सव्वा लाखांहून अधिक मतदान झाल्यास शेवाळेंना चार लाखांहून अधिक मतांचा टप्पा सहज गाठता येवू शकतो असेही बोलले जात आहे. माहिम दादरमध्ये सरासरी ४० हजार, वडाळामध्ये सरासरी १० ते १५ हजार, शीव कोळीवाडामध्ये सरासरी १० हजार, धारावीत ३ ते ४ हजार, चेंबुरमध्ये सरासरी दहा हजार आणि अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रांमध्ये मनसेचे सरासरी पाच ते सहा हजार पक्के मतदार असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येत आह. त्यामुळे एक लाखांच्या आसपास मनसेचे पक्के मतदार असून यंदा राज ठाकरे यांनी आव्हान केल्यानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमध्ये मनसेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून येईन. (Lok Sabha Election)

(हेही वाचा विधानसभेतही Baramati मध्ये पवार विरुद्ध पवार; अजित पवारांच्या विरोधात कोण?)

शेवाळेंप्रती मतदारांच्या अपेक्षा 

शेवाळेंना सन २०१४मध्ये ३ लाख ८१ हजार मते मिळाली होती, तर सन २०१९च्या निवडणुकीत शेवाळेंच्या मतांमध्ये वाढ होऊन ४४ हजार मते वाढली गेली. पण पराभूत उमेदवार गायकवाड यांच्या मतांमध्येही ३० हजारांनी वाढ झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे शेवाळेंना गाफिल राहून उपयोग नाही. त्यासाठीच धारावी, वडाळा, अँटॉप हिल, शीव कोळीवाडा, चेंबूर आदी भागांमध्ये शेवाळेंनी मनसेसह इतर वक्त्यांच्या तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभाही घेतल्या. तसेच अनिल देसाई यांच्यासाठीही आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहे. तर काही भागांमध्ये काँग्रेसचा विरोध दिसून येत असल्याने काँग्रेस पक्ष अनिल देसाई यांच्यासाठी किती सक्रिय काम करता याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. त्यातच धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईतून लढत असल्याने शेवाळेंसाठी धारावीचे मैदान मोकळे आहे. त्यातच धारावीतील बबू खान, गंगा मान, कुणाल माने, रेश्मा बानो, भास्कर शेट्टी हे महत्वाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांची फौज शेवाळेंकडे असल्याने यंदा धारावीतील मतदान शेवाळेंच्या बाजुने किती वाढते याकडेही सर्वांचे लक्ष असेल. विशेष म्हणजे शेवाळेंकडील धनुष्यबाण चिन्ह परिचित असल्याने याचा फायदा त्यांना होऊ शकेल असेही बोलले जात आहे. (Lok Sabha Election)

या लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) धारावी पुनर्विकास हा प्रमुख मुद्दा असून रेल्वे जागेवरील लोकांचा या प्रकल्पांत समावेश करण्यासाठी शेवाळेंनी प्रयत्न केले हे जगजाहीर आहे. त्यामुळे याचे श्रेय शेवाळेंना जात आहे. त्याबरोबरच देवनार कॉलनीच्या पुनर्विकासाचा मार्ग त्यांनी मोकळा केला, अणुशक्ती नगरमधील झोपडपट्टया, वडाळ्यातील कोरबा मिठागराच्या जागेवरील झोपड्यांचा विकास, मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील म्हाडा वसाहतील सेवा सुविधा, प्रकल्पबाधितांच्या सुविधा, धारावीनंतर सर्वांत मोठी वस्ती मानली जाणारी झोपडपट्टी ही चिता कॅम्प आहे, याच्या पुनर्विकासा आणि सेवा सुविधांचा प्रश्न, या परिसरात औष्णिक वीज प्रकल्प, तेल शुध्दीकरण प्रकल्प, भाभा अणुसंशोधन केद्र असून या संपूर्ण मतदार संघात प्रदुषण आणि आरोग्याच्या समस्या मोठ्याप्रमाणात आहेत. विशेष म्हणजे प्रकल्पबाधितांच्या वसाहतींमध्ये पायाभूत सेवा सुविधांचा अभाव आहे, तसेच बीडीडी चाळींप्रमाणे वडाळा विधानसभा क्षेत्रातील बीआयटी चाळींसह स्प्रिंग मिल कंपाऊंडसह वडाळा आणि माहिम पोलिस वसाहती, माहिम मच्छिमारांच्या वसाहतींमधील सेवा सुविधा अशा प्रकारच्या प्रमुख समस्या आहेत. शिवाय माहिम दादरमध्ये आजही जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना आजही अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे भाडेकरुंना आज स्वत:च्या घरात राहता येत नाही, पण दुकाने सुरु झाली आहेत. त्यामुळे याप्रकरणांत आता खासदारांनी लक्ष घालावे अशी मागणी मतदारांकडून केली जात आहे.

(हेही वाचा शरद पवार सेक्युलर नाहीत, ते संधीसाधू आहेत; Prakash Ambedkar यांची टीका)

मागील दोन निवडणुकीचा आढावा 

सन २००९

  • एकनाथ गायकवाड (काँग्रेस) २,५७,५२३ मते
  • सुरेश गंभीर (शिवसेना) १,८१,८१७ मते

सन २०१४

  • राहुल शेवाळे (शिवसेना) ३, ८१,००८ मते
  • एकनाथ गायकवाड (काँग्रेस) २,४२,८२८ मते

सन २०१९

  • राहुल शेवाळे (शिवसेना) ४,२४,९१३ मते
  • एकनाथ गायकवाड (काँग्रेस) २,७२,७७४ मते

दक्षिण मध्य मुंबईतील आमदार

  • माहिम दादर : सदा सरवणकर, शिवसेना
  • वडाळा, कालिदास कोळंबकर, भाजपा
  • शीव कोळीवाडा : आर तमिल सेल्वन, भाजपा
  • धारावी : वर्षा गायकवाड, काँग्रेस
  • चेंबूर : प्रकाश फातर्पेकर, शिवसेना उबाठा
  • अणुशक्ती नगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.