सीसीटीव्ही बंद असले तरी EVM सुरक्षित; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा

181

आत्तापर्यंत ज्या मतदारसंघांत मतदान झाले तेथे इव्हीएम (EVM) मशिन सुरक्षित आहेत. तीन टप्प्यांत येथे सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे ती भेदून कुणीही जाऊ शकत नाही, त्यामुळे सीसीटीव्ही बंद असले तरी फरक पडत नाही, असा खुलासा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पैसे वाटपावर कारवाई करू असे मोघम उत्तर देत प्रश्नांना बगल दिली. पाचव्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील १३ मतदारसंघांत २० मे रोजी मतदान होत असून यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा १ मतदारसंघातील २४ हजार ५७९ मतदान केंद्रांत मतदान होणार आहेत. पाचव्या टप्प्यात मुबंई उत्तर आणि मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघांत संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या जास्त असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली. (EVM)

तीन टप्प्यातील सुरक्षा यंत्रणा

ते म्हणाले, ‘मतदान झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत ईव्हीएम मशिन (EVM) स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात. त्यावेळी सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत ही स्ट्राँग रुम सील केली जाते. त्यानंतर त्यावर सह्या घेतल्या जातात. येथे उमेदवारांचे प्रतिनिधीही पहारा देऊ शकतात. तसे काही ठिकाणी आहेत. पुणे आणि बारामती येथे उमेदवारांचे प्रतिनिधी पहारा देत आहेत. स्ट्राँग रुमबाहेर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, सीआरपीएफ आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांचा पहारा असतो. तीन टप्प्यातील यंत्रणा भेदून आत जाणे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे सीसीटीव्ही बंद असल्याने फारसा फरक पडत नाही. सुरक्षा यंत्रणा आणि सील या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बीडमधील मतदान केंद्र ताब्यात घेण्याच्या प्रकाराबाबत आपल्याकडे तक्रार न आल्याचे चोकलिंगम म्हणाले. अशी तक्रार आल्यास कारवाई करू असेही ते म्हणाले.

(हेही वाचा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस सत्तेत आले तर रामलला पुन्हा तंबूत जातील; PM Narendra Modi यांची चेतावणी)

पैसे वाटप करणा-यांवर कारवाई करू

चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल झाले. काही उमेदवारांची नावे घेऊन त्यांना मतदान करा असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तरीही यंत्रणा गप्प आहेत, असा प्रश्न केला असता अशा प्रकरणांत कारवाई केली आहे. त्याबाबतची आकडेवारी जाहीर करू, असे चोकलिंगम म्हणाले. मात्र, काय कारवाई केली याबाबत माहिती देण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी बगल दिली. (EVM)

मुंबईतील मतदान टक्क्याची चिंता

पाचव्या टप्प्यात मुंबईतील शहरी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करून टक्का वाढविण्याची चिंता आयोगाला लागली आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे सर्व जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिका-यांना सूचना केल्या आहेत. पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघांत २४ हजार ५७९ मतदान केंद्रे असून १६० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. २६४ उमेदवार रिंगणात असून मतदारसंख्या २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ आहे. यातील पुरुष मतदार १ कोटी ३१ लाख, ५२६ तर महिला मतदार १ कोटी १५ लाख २८ हजार २७८ आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.