- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयकडून (BCCI) माजी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरला विचारणा झाल्याचं समजतंय. बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून २७ तारखेपर्यंत अर्जही मागवले आहेत. आणि त्यातच आता गंभीर बरोबर बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांची बोलणी सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नवीन प्रशिक्षकाची मुदत जुलै २०२४ ते डिसेंबर २०२७ पर्यंत असेल. आणि टी-२०, एकदिवसीय तसंच कसोटी सामन्यांतही प्रशिक्षक भारतीय संघाबरोबर असेल. (Gautam Gambhir)
आधीचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी डिसेंबर २०२१ नंतर संघाची धुरा हातात घेतली होती. आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांची मुदत संपली. पण, काही महिन्यात असलेल्या टी-२० विश्वचषकापर्यंत त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला होता. पण, आता ती मुदतही जूनमध्ये संपतेय. आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच स्पष्ट केल्याप्रमाणे द्रविड यांना पदावर कायम राहायचं असेल तर त्यांना नव्याने अर्ज करावा लागणार आहे. (Gautam Gambhir)
(हेही वाचा – IPC 323 In Marathi : काय आहे IPC कलम ३२३? चला जाणून घेऊया या कायद्याबद्दल!)
गंभीरने आजपर्यंत प्रशिक्षक पद निभावलेलं नाही
सध्यातरी द्रविड यांची पदावर कायम राहण्याची इच्छा दिसत नाही. तर क्रिकइन्फो या वेबसाईटवर आलेल्या एका बातमीनुसार, बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल फ्रँचाईजीचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्याशी अनौपचारिक चर्चा सुरू केली आहे. इतकंच नाही तर आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर गंभीर बरोबरची चर्चा आणखी पुढे नेण्यात येणार असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. ४२ वर्षीय गंभीरने आजपर्यंत प्रशिक्षक पद निभावलेलं नाही. पण, आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघाचा मार्गदर्शक किंवा मेंटॉर म्हणून काम पाहिलं आहे. यंदा कोलकाता संघाच्या बाद फेरीतील प्रवेशाचं श्रेय संघातील खेळाडूंनीही गंभीरला दिलं आहे. (Gautam Gambhir)
क्रिकेटपटू म्हणून गंभीर २००७ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या तसंच २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. विरेंद्र सेहवागबरोबरची त्याची जोडी तेव्हा प्रसिद्ध होती आणि आयपीएलमध्येही कोलकाता नाईट रायडर्सला २०१२ आणि २०१४ मध्ये विजेतेपद त्याच्याच नेतृत्वाखाली मिळालं होतं. क्रिकेटपटू आणि मार्गदर्शक म्हणूनही त्याची कारकीर्द यशस्वी ठरली आहे. त्यामुळेच बीसीसीआयने (BCCI) त्याला पसंती दिल्याचं दिसतंय. आयएएनएस या आणखी एका वृत्तसंस्थेनं गौतम गंभीर बरोबरच रिकी पाँटिंग, स्टिफन फ्लेमिंग, आशीष नेहरा आणि जस्टिन लँगर यांच्या नावाचीही मुख्य प्रशिक्षक म्हणून चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे. (Gautam Gambhir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community