‘ड्रॉप बॉक्स’ (Drop Box) मधून चेक (धनादेश) चोरणाऱ्या टोळीतील एकाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही टोळी ड्रॉप बॉक्समधून चेक चोरी करून त्यात खाडाखोड करून स्वतःच्या खात्यावर चेक टाकत होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर दक्षिण मुंबईत अनेक गुन्हे दाखल असून ही टोळी मागील वर्षभरापासून चेक चोरीचे गुन्हे करीत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अक्सिक्स बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये बसविण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्समधील (Drop Box) चेक (धनादेश) चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यातील अडीच लाख रुपयांचा एक चेक दुसऱ्या बँकेत वटविण्यात आला होता. या गुन्ह्याचा संलग्न तपास गुन्हे शाखा कक्ष-३ चे पथक करीत असताना कक्ष ३च्या पथकाने बँक डिटेल्स घेऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र बँकेचे दिलेल्या पत्ता चुकीचा असल्यामुळे आरोपीपर्यंत पोहचता येत नव्हते. दरम्यान पोलिसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही तपासले असता दोन संशयित इसम सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ड्रॉप बॉक्स (Drop Box) मधून चेक काढताना दिसून येत होते. गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची माहिती काढली असता आरोपी हा फोर्ट परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
(हेही वाचा कुर्ल्याचा अमान शेख पाकिस्तान गुप्तचर संघटनेचा हस्तक; NIAने काय म्हटले पुरवणी आरोपपत्रात?)
श्रीनिवास रामपाल कजानिया (५०) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. श्रीनिवास हा दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात राहणारा आहे. श्रीनिवास हा आपल्या एका साथीदारासोबत बँकेच्या एटीएम सेंटरमधील ड्रॉप बॉक्स (Drop Box) मधून चेक काढून त्या चेकवरील नाव एका विशिष्ठ केमिकल वापरून खोडत असे, त्यानंतर त्या ठिकाणी स्वतःचे नाव टाकून तो चेक स्वतःच्या बँक खात्यावर टाकून पैसे काढून घेत होते, अशी माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे.आरोपी श्रीनिवास याचे विविध बँकांमध्ये १७ खाते असल्याचे समोर आले असून प्रत्येक बँक खात्यावर त्याने चुकीचा पत्ता दिल्यामुळे तो पकडला जात नव्हता असे पोलिसांनी सांगितले. श्रीनिवास याच्याविरुद्ध दक्षिण मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहे. गुन्हे शाखा कक्ष ३ ने श्रीनिवास याचा ताबा नागपाडा पोलिसांकडे दिला असून नागपाडा पोलिसांनी श्रीनिवास ला अटक केली असून त्याचे सर्व बँक खाते गोठवले आहे. त्याच्या साथीदाराचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community