आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुरवली आर्थिक रसद! भाजपचा हल्लाबोल

भाजपला सुपर स्प्रेडर म्हणताना आपल्या पक्षाने या देशाला किती कीड लावून ठेवली, याचे आत्मचिंतन सचिन सावंत यांनी केले तर कदाचित त्यांना लवकर बोध होईल.

123

मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी आर्थिक रसद पुरवली आणि आता आरक्षण घालवल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कोणी आंदोलन करत असेल, तर त्याला घाबरवून निव्वळ अफवा पसरवण्याचे उपटसुंभे धंदे सचिन सावंत यांनी बंद करावे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

परिश्रमाने मिळवलेले आरक्षण घालवले

‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ला कोणकोणत्या नेत्यांनी देणग्या दिल्या, याचीही माहिती आहेच. त्यामुळे निव्वळ अफवा पसरवण्याचा आपला छंद सचिन सावंत यांनी किमान या संवेदनशील विषयात तरी जपू नये. मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयात त्या समाजाशी असा पोरखेळ करण्याचा कोणताही अधिकार सचिन सावंत यांना नाही. मुळात गेली 60 वर्ष जो प्रश्न तुम्ही खितपत ठेवला, ते मराठा आरक्षण मिळवून देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. एवढेच नाही तर ते उच्च न्यायालयात टिकवले सुद्धा. पण, सर्वोच्च न्यायालयात निव्वळ तारखा मागायच्या, गायकवाड आयोगाच्या परिशिष्टांचे भाषांतरच सादर करायचे नाही, असे प्रकार याच सरकारने केले आणि त्यामुळे प्रचंड परिश्रमाने मिळवलेले आरक्षण घालवण्यात आले.

(हेही वाचाः संभाजी राजेंच्या मनात चाललंय काय?)

सावंतांनी आत्मचिंतन करावे

आता मराठा समाजासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय भाजपने घेतला, तर त्यात सचिन सावंतांना पोटशूळ का उठावा? मराठा समाजासोबत आम्ही सत्तेत असतानाही होतो आणि यापुढेही राहू. स्वत: करायचे काही नाही आणि दुसर्‍यांच्या पायात पाय टाकायचे, हीच काँग्रेस पक्षाची कायम संस्कृती राहिली आहे. स्वत:च्या पक्षांतर्गत सवयी किमान बाहेरच्या बाबतीत तरी त्यांनी वापरू नये. मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी आर्थिक रसद पुरवली होती. भाजपला सुपर स्प्रेडर म्हणताना आपल्या पक्षाने या देशाला किती कीड लावून ठेवली, याचे आत्मचिंतन सचिन सावंत यांनी केले तर कदाचित त्यांना लवकर बोध होईल. अन्यथा थापा आणि अफवा याच विश्वात ते रममाण राहतील, असेही केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.