नेटफ्लिक्सकडून अश्लिलता, हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जाईल, अशा वेब सीरिज वारंवार प्रदर्शित केल्या जातात. कारण अद्याप ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंपन्या बिनदिक्कतपणे समाजातील नैतिकतेचे हनन होईल, अशा वेब सीरिज प्रदर्शित करतात. तसेच ‘बॉम्बे बेगम’ या वेब सीरिजमधूनही बाल लैंगिकतेला प्रोत्साहन देणारी दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. या प्रकरणी नेटफ्लिक्स आणि या वेब सीरिजचे निर्माते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने राज्य सरकारला दिले, तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.
वेब सीरिजच्या विरोधात तक्रारी!
राज्याचे गृहसचिव आणि मुंबई पोलिस यांना आयोगाने स्वतंत्र पत्र लिहून नेटफ्लिक्स आणि बॉम्बे बेगम सीरिजच्या निर्मात्याच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्यामध्ये वेब सीरिजच्या निर्मात्याने ‘बॉम्बे बेगम’ या सीरिजमध्ये लहान मुले अमली पदार्थांचे सेवन करतात, शाळेत अश्लील छायाचित्रे पाहतात असे दाखवण्यात आले आहे. अशा प्रकारचे कथानक हे बाल कल्याण आणि सुरक्षासंबंधी बनवण्यात आलेल्या कायद्याचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे या सीरिजचे प्रदर्शन थांबण्याचे निर्देश आयोगाने दिले होते.
(हेही वाचा : बालमोहनच्या शिक्षिका रणदिवेंची मदतीची हाक! विद्यार्थी राज-उद्धव ठाकरे धावले मदतीला! )
लहान मुलांमध्ये कुसंस्काराचे बीजारोपण!
मार्च महिन्यात आयोगाने नेटफ्लिक्सला २४ तासांत कारवाई करून अहवाल देण्यास सांगितले होते. अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला होता. नेटफ्लिक्सनेही याची दखल घेतली नाही. या वेब सीरिजच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये कुसंस्काराचे बीजारोपण होत आहे. त्यामुळे या वेब सीरिजच्या निर्मात्याने बाल न्याय अधिनियम २०१५, कलम ७७चे उल्लंघन केले आहे. म्हणून आयोगाने मुंबई पोलिस आयुक्त यांना वेब सीरिजच्या निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. ही वेब सीरिज अलंकृता श्रीवास्तव यांनी लिहिली आहे, तर पूजा भट यांची प्रमुख भूमिका आहे. ही वेब सीरिज मुंबईतील विविध क्षेत्रातील ५ महिलांच्या जीवनावर आधारित आहे.
Join Our WhatsApp Community