कोरोना संकटकाळात बचतगटांतील महिलांची अशीही कामगिरी

कोरोनामुळे आर्थिक संकट असताना राज्यातील या महिलांनी स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याबरोबरच लोकांसाठी मास्क, सॅनिटायझरसारख्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करुन दिली आहे. 

122

लॉकडाऊनच्या काळात राज्यात ग्रामीण जीवनोन्नती(उमेद) अभियानांतर्गत सहभागी बचत गटांतील महिलांनी मास्क निर्मिती व विक्री, सॅनिटायझर निर्मिती व विक्री यांसह विविध उपक्रम राबवून सुमारे ६० कोटी ३ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोनामुळे आर्थिक संकट असताना राज्यातील या महिलांनी स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याबरोबरच लोकांसाठी मास्क, सॅनिटायझरसारख्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करुन दिली आहे. 

मास्क विक्रीतून कोट्यावधींची उलाढाल

३४ जिल्ह्यांतील ७३० स्वयंसहाय्यता समूहामधील १ हजार ९८१ महिलांमार्फत नुकतेच ८.७८ लाख मास्क बनवण्यात आले असून, ७.७६ लाख मास्कच्या विक्रीमधून १ कोटी १९ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेत या बचतगटांनी सुमारे १ कोटी १० लाख मास्कची निर्मिती करुन, त्यांच्या विक्रीतून सुमारे १३ कोटी ३० लाख रुपयांची उलाढाल केली होती.

(हेही वाचाः राज्याची कौतुकास्पद कामगिरी! वर्षभरात रोखले 560 बालविवाह)

सॅनिटायझर आणि भाजीपाला विक्रीतूनही उलाढाल

  • कोरोना काळात आवश्यक असणाऱ्या सॅनिटायझरची निर्मिती आणि विक्रीही बचतगटांमार्फत करण्यात आली. राज्यातील १९ जिल्ह्यांतील ४० स्वयंसहाय्यता समूहांमधील १९९ महिलांमार्फत ८ हजार ५९ लिटर सॅनिटायझरची निर्मिती करण्यात आली असून, ५ हजार ४९ लिटर सॅनिटायझरच्या विक्रीमधून ११ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. लॉकडाऊन काळात शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाजीपाला पुरवठा करण्याचे काम स्वयंसहाय्य्यता समूहांनी केले. यामध्ये ३४ जिल्ह्यांतील १ हजार ९६६ समूहातील ४ हजार १९६ महिला सहभागी असून, त्यांनी ८ हजार ६४९ क्विंटल भाजीपाला विक्रीतून २ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. पहिल्या लाटेच्या काळातही महिला बचतगटांनी या माध्यमातून १६ कोटी ७५ लाख रुपयांची उलाढाल केली होती.
  • फळे खरेदी-विक्रीमध्ये ३४ जिल्ह्यांतील १ हजार २२५ समूहांतील ३ हजार २०५ महिला सहभागी असून, त्यांनी ६ हजार ७७५ क्विंटल फळे विक्रीतून ३ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. पहिल्या लाटेच्या काळात या माध्यमातून ३ कोटी ६ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
  • राज्यातील २९ जिल्ह्यांतील एकूण ७९६ स्वयंसहाय्यता समूहांनी २ हजार ११६ महिलांच्या माध्यमातून धान्य खरेदी व विक्री केली असून, ४१ हजार ३४४ क्विंटल धान्याची विक्री झालेली आहे. त्यामध्ये ९ कोटी ६८ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. पहिल्या लाटेच्या काळात या माध्यमातून ४ कोटी २२ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
  • कोविड केंद्रांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिलांनी जेवणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये १६ जिल्ह्यांतील ४० ठिकाणी जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
  • १ हजार ७७९ गावातील ५१७ महिला स्वयंसहाय्यता समूहातील ३ हजार १२५ महिलांनी सामूहिक खरेदीचा अवलंब करुन बी-बियाणे, खते आणि औषधांची एकत्रित खरेदी केली. यातून ४ कोटी ७२ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. पहिल्या लाटेच्या काळात या माध्यमातून सुमारे ५६ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
  • ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांनी बनविलेल्या मालाला ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत स्थापित समूहांची उत्पादने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातून १२.२५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

(हेही वाचाः कोरोना काळातही देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक! गुजरातने मारली बाजी)

या सर्व महिलांचे मंत्री मुश्रीफ यांनी अभिनंदन केले असून समाजाला कोरोना संकटाच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच झालेल्या व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक आधार देण्यात या महिलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. महिलांना यापुढील काळातही बचतगटांच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.