Manusmriti वेळीच शिकवली असती तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती; रमेश शिंदेंचा हल्लाबोल

जर हे पुरोगामी मनुस्मृतीला (Manusmriti) इतका विरोध करतात, तर कोलकाता कुराण पेटिशनमध्ये त्या ग्रंथातील समाजात विद्वेष पसरवणाऱ्या आयतींना विरोध करण्याचे धाडस ते दाखवतील का?, असा सवाल रमेश शिंदे यांनी केला.

302

अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील (Manusmriti) वयोवृद्ध, ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे; परंतु आज त्यांच्या पक्षाची स्थिती पाहिली, तर ‘वयोवृद्ध’ म्हणून त्यांना कोण मान देत आहे? त्यांच्या पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडले आहेत. मनुस्मृतीमधील हा श्लोक त्यांनी वेळेत शिकवला असता, तर त्यांच्या पक्षावर आजची वेळ आली नसती, असा घणाघात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केला.

राज्यघटनेत डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचा समावेश केला

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती (Manusmriti) आणि मनाचे श्लोक शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याला शरद पवार यांनी विरोध केला आहे. त्यावर रमेश शिंदे यांनी शरद पवारांचा खरपूस समाचार घेतला. ‘महाराष्ट्र शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकाचा उल्लेख आल्यामुळे समस्त पुरोगाम्यांना पोटशुळ उठला आहे. जणू काही आता मनूचे राज्य आणि चातुर्वणव्यवस्था येणार आहे? मूळात देशात राज्यघटनात्मक व्यवस्था, सर्वाेच्च न्यायालय असतांना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का? धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आहे की, कलियुगासाठी पराशरस्मृतीचा उपयोग केला पाहिजे. यातील एका श्लोकात म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक, पालक, तपोवृद्ध, वयोवृद्ध यांचा आदर केला, तर कीर्ती, बळ आणि यश वाढेल. डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृती जाळल्याचा उल्लेख सातत्याने केला जातो; परंतु ११ जानेवारी १९५० या दिवशी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात भाषण करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये वारसा हक्क आणि स्त्रियांसाठी दायभाग यांच्यासाठी मी मनस्मृतीचा उपयोग केला असल्याचे त्यांनी म्हटले.

समाजात विद्वेष पसरवणाऱ्या आयतींना विरोध करणार का? 

‘जेथे स्त्रियांचे पूजन होते, तेथे देवता वास करतात’ ही मनुस्मृतीची (Manusmriti) शिकवण आहे. जगात मनुस्मृती हा एकमेव धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये संपत्तीमध्ये महिलांचा सहभाग दिला आहे. हा अधिकार केवळ भारतामध्ये होता. अशा मनुस्मृतीचा चांगला श्लोक अभ्यासक्रमातून रहित करण्याची भूमिका मांडणे हा बौद्धीक आतंकवाद आहे. ’’जर हे पुरोगामी मनुस्मृतीला (Manusmriti) इतका विरोध करतात, तर कोलकाता कुराण पेटिशनमध्ये त्या ग्रंथातील समाजात विद्वेष पसरवणाऱ्या आयतींना विरोध करण्याचे धाडस ते दाखवतील का?, असा सवाल रमेश शिंदे यांनी केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.