- संतोष वाघ
मुंबई महानगर पालिकेच्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) उपचारासाठी आलेल्या मुंब्र्यातील महिलेला सायन रुग्णालयातील डॉक्टरच्याच मोटारीने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी, 24 मे रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर तब्बल 16 तासांनी सायन पोलीस ठाण्यात डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा अपघात सायन रुग्णालयातील न्यायवैधक विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांच्या मोटारीने झाला असून डॉक्टर डेरे हे स्वतः मोटार चालवत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
जुबेदा शेख (५८) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. जुबेदा शेख या मुंब्रा कौसा येथील गुलाम नगर येथे आपल्या कुटुंबियासह काही वर्षापूर्वी राहण्यास आल्या होत्या. त्यांचे कुटुंब पूर्वी वांद्रे पूर्व येथे राहत होते. जुबेदा यांना दोन मुलगे आणि विवाहित मुलगी आहे. जुबेदा यांचे पती मुंबईत एका खाजगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, एक मुलगा डिलिव्हरी बॉय असून दुसरा मुलगा खाजगी नोकरी करतो.
(हेही वाचा Pune Porsche Car Accident: अग्रवाल बाप-बेट्याच्या तावडीतून ‘असा’ सुटला ड्रायव्हर!)
रुग्णालयाच्या आवारातच अपघात
जुबेदा यांना मधुमेहाचा आजार होता व त्यात यांच्या हाताला जखम होऊन ती जखम चिघळल्याने दोन आठवड्यापूर्वी त्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) दाखल झालेल्या होत्या. आठवड्याभरापूर्वी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती, त्या फोल अपसाठी रुग्णालयात येत होत्या. शुक्रवारी दुपारी त्या मुंब्रा येथून एकट्या उपचारासाठी आलेल्या होत्या. सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास त्या उपचार घेऊन घरी जाण्यासाठी रुग्णालयातून बाहेर पडत असताना सायन रुग्णालयाच्या गेट क्रमांक ७ येथे रुग्णालयांच्या आवारात त्यांना मोटारीने धडक दिली. जुबेदा या डॉक्टर डेरे याच्या मोटारीखाली आल्या, त्यांना तात्काळ उपचारासाठी सायन रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात आणण्यात आले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला.
काय म्हणाले डॉ. डेरे?
रात्री उशिरा या अपघाताची माहिती सायन पोलिसांना देण्यात आली, सायन पोलिसांनी रुग्णालयात (Sion Hospital) धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदन येथे आणून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृत महिलेची ओळख शनिवारी दुपारी पटली असता पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबियांना कळविण्यात आले. दरम्यान सायन पोलिसांनी सायन रुग्णालय परिसरात झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान ज्या मोटारीच्या धडकेत जुबेदा यांचा अपघात ती मोटार सायन रुग्णालयाचे (Sion Hospital) न्यायवैधक विभागाचे डॉ. राजेश डेरे हे चालवत होते, ‘हिंदुस्थान पोस्ट’ने डॉ. डेरे यांना गाठून त्यांची प्रतिक्रिया घेतली असता डॉ. डेरे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले की, “मी घरी जाण्यासाठी माझ्या मोटारीने निघालो होते, माझ्या मोटारीसमोर बळीत महिला अचानक आल्यामुळे तीला माझ्या मोटारीची धडक बसली, मोटारीचा वेग खूपच कमी होता, मी मोटारीतून बाहेर आलो व रुगणालयातील कर्मचारी यांच्या मदतीने जखमी झालेल्या महिलेला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले होते.” त्यावेळी तिच्या अंगावर कुठल्याही जखमा नव्हत्या, तिचा मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाला, असा दावा डॉ. डेरे यांनी केला आहे. ही एक घटना होती व मी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, पुढे पोलीसांकडून काय दाखल करण्यात येते हे सांगू शकत नाही, असे डॉ. डेरे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना सांगितले. सायन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे सायन पोलीस ठाण्याच्या वपोनि. मनीषा शिर्के यांनी सांगितले.