Veer Savarkar : दिमाखदार सोहळ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान

स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

165
Veer Savarkar: दिमाखदार सोहळ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान
Veer Savarkar: दिमाखदार सोहळ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान, समाजसेवा आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सभागृहात रविवार, (२६ मे) संपन्न झाला. (Veer Savarkar)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार- २०२४’ भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी (आय. एन. ए.)चे डॉ. सुहास जोशी यांना तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कालातीत विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे विद्याधर जयराम नारगोळकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार- २०२४’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार -२०२४’ अभिनेता रणदीप हुड्डा यांना बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. (Veer Savarkar)

स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यासह आयआयटी इंदूरचे डॉ. सुहास जोशी, सावरकर विचार प्रसारक संस्थेचे विद्याधर नारगोळकर आणि  ‘स्वातंत्र्यवीर’ चित्रपटाचे निर्माते, लेखक, अभिनेते रणदीप हुड्डा पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा – Veer Savarkar : सैनिकीक्षमता कमी झाल्याने १२०० वर्षे पारतंत्र्य आपल्या देशाच्या डोक्यावर बसले – रणजित सावरकर)

वीर सावरकरांच्या ‘जयोस्तुते श्री महन्मंगले… शिवास्पदे शुभदे’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी स्मारकाचे अध्यक्ष प्रविण दीक्षित आणि स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा वीर सावरकर यांची प्रतिमा आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदानाकरिता तसेच ‘ऑपरेशन विजय’ आणि ‘टायगर हिल’ सैन्य दलातील या महत्त्वपूर्ण कामगिरीकरिता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार -२०२४’ने कर्नल सचिन अण्णाराव निंबाळकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. कार्यबाहुल्यामुळे प्रत्यक्ष सोहळ्यात ते उपस्थित नव्हते. ऑपरेशन विजयदरम्यान, डेल्टा कंपनीचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सचिन अण्णाराव निंबाळकर यांना ३-४ जुलै १९९९च्या रात्री झालेल्या हल्ल्यात पूर्वेकडून द्रास सेक्टरमधील टायगर हिल शिखर काबीज करण्याचे काम देण्यात आले होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अभ्यास आणि अध्यापनाबरोबरच यंत्रनिर्मिती क्षेत्रात सातत्याने संशोधन, नवनिर्मितीवर भर तसेच उत्पादन, यांत्रिक प्रक्रियांचा विकास, अल्ट्रा-स्मॉल लेसर मेकॅनिक्स, लिगा आणि नॅनो पॉलिशिंग याबाबतीत अभियांत्रिकी क्षेत्रात अद्वितीय योगदान तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील अमूल्य कार्याचा सन्मान करण्यासाठी डॉ. सुहास जोशी यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार – २०२४’ प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि स्मृतिचिन्ह, रू. ५१,००० असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे प्रचारक आणि प्रसारक, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान मल्लखंब आणि कुस्तीसारख्या भारतीय खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच महाराष्ट्र राज्य मल्लखंब असोसिएशनचे संयुक्त सचिव आणि पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष विद्याधर जयराम नारगोळकर यांना  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार- २०२४’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक असून विविध संस्था आणि संघटनांची जबाबदारी ते सांभाळत आहेत. पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष, अखंड हिंदुस्थान मंचाचे उपाध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. हिंदु राष्ट्रासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र आणण्याचे त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. ‘सावरकर “आणि’ समन्वय” या वीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांच्या विविध कार्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्काराने गौरवण्यात आले. मानपत्र आणि रू. २५,००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी विद्याधर नारगोळकर यांनी वीर सावरकर यांच्या छायाचित्रांचे कोलाज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिले.

‘वीर सावरकर’ या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते रणदीप हुड्डा यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार – २०२४’ ने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रुपये ५१,००० असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली गणपतीच्या हातातील ‘परशू’ या शस्त्राचे वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट साकारून खरा इतिहास लोकांसमोर आणल्याबद्दल त्यांना हे विशेष स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी प्रमुख पाहुणे, पुरस्कार विजेते आणि पुरस्कार निवड समितीचे सदस्य, विज्ञान पुरस्कार निवडीसाठी डॉ. अमोल गोखले आणि शौर्य पुरस्कार निवडीसाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचेही दीक्षित यांनी आभार मानले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.